शिवाय, शेतकरी मुद्द्यावरुन भाजपचं आंदोलन, बाळासाहेबांना दिलेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द, राज्यावरील कर्जाचा बोझा वाढवून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या टीकांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
गरिबांना तीनचाकीच परवडते, बुलेट ट्रेन नाही
"आमच्या सरकारने असं ठरवलंय की कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सध्याचं सरकार म्हणजे तीनचाकी सरकार आहे. मात्र देवेंद्रजी गरिबांना तीनचाकी रिक्षाच परवडते, बुलेट ट्रेन नाही," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
भारुडाला अभंगातून उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या प्रत्येक टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वरांच्या भारुडाचा आधार घेतला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या अभंगातून उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले की,
अच्छे दिन येता येईचिना
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होईचिना
देशातली बेकारी हटेचिना
दोन कोटी रोजगार मिळेचिना
स्मार्ट सिटी होईचिना
काला पैसा भारतात येईचिना
आर्थिक मंदी हटेचिना
बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कुठल्याही थराला
मुख्यमंत्रीपदाबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेना दिलेल्या शब्दावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, "दिलेल्या शब्दांचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं? बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, मी त्या थराला गेलो."
भाजपची पालखी कायम वाहणार नाही
भाजपचं ओझं कायम वाहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ते म्हणाले की, "मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, असा शब्दही बाळासाहेबांना दिला नव्हता. बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही. भाजपचे ओझे आता आम्ही उतरवून टाकू. चहापेक्षा किटली गरम असं कुणीतरी म्हणाले. मात्र किटली पुसणारे फडके पण गरम होऊ लागले आहे."
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन सवाल
गोवंश हत्याबंदीवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मीरचे हिंदू सगळीकडे स्थिरावले. सावरकर मनात असू द्या. सावरकर म्हणजे काय हे दुसऱ्यांना समजून सांगाण्याऐवजी आपण समजून घेऊया. माझ्या महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता?" तसंच "सावरकर कोण शिकवतंय? सावरकर कळले आहेत का? एकमेकांचे कपडे फाडण्यापेक्षा, एकमेकांवर चिखल फेकण्यापेक्षा सावरकर समजून घ्या," असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.