नागपूर: नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटात संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. ही घटना काल (सोमवार, 17 मार्च ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा परिणाम आज शहरात दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.अनेकांची वाहने अज्ञातांनी फोडली, त्याचबरोबर काहींच्या गाड्यांना आग लावून पेटवून दिली. या सर्व घटनेवरती संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावेळी जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्यासह अन्य पोलिस आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नागपुरातील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आज संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांच्या कामाचं आणि काल परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली त्याबाबत त्यांचं कौतुक केलं, त्याचबरोबर त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नागपुरातील महाल परिसरात काल (सोमवारी रात्री 17 मार्च 2025) जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोन उपयुक्तांसाह एकूण 22 जण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) शशिकांत सातव यांच्यासह एकूण 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 अग्निशमन दलाचे जवान आणि 5 नागरिकांनाही जखमी अवस्थेत तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर शशिकांत सातव यांच्या पायावर रॉडने हल्ला केल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
नागपुरममधील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्यांच्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार काल (सोमवारी, ता, 17) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला आहे. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झाला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद केले आहेत. त्याचबरोबर या भागातील शाळांना सुट्टी आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जमावबंदी केली आहे.