Nagpur Railway Time Table : नागपुरात घसरलेला पारा अन् सर्वत्र दाट धुक्याचे वातावरण (Foggy Weather in Nagpur) निर्माण झाल्याने रेल्वे सेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले आहे.


सध्या अनेक मार्गावर रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. अशात दोन दिवसांपासून सर्वत्र दाट धुके पसरल्याने रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. 1 तासापासून तर 14 तासांपर्यंतचा विलंब झाल्याने या गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. त्यामुळेच गुरुवारी (5 जानेवारी) रेल्वे स्थानक परिसर अन् प्रतीक्षालयात प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळत होती.


विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानक आणि परिसरात आहे. त्यात थंडीचा कडाका असल्याने चहा, कॉफीची मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे काही चहा विक्रेत्यांनी अचानक चहा-कॉफीचे भाव वाढवले असून चहा. कॉफीच्या नावाने गोड गरम पाणी विकले जात असल्याचीही ओरड आहे.


कोणत्या आहेत विलंबाने धावणाऱ्या गाड्या?



  • 12261 सीएसटीएम-हावडा, दुरंतो एक्स्प्रेस 14 तास 20 मिनिटे उशिरा 

  • 12129 पुणे - हावडा आजाद हिंद एक्स्प्रेस 13.25 तास विलंब

  • 12126 हावडा सीएसटीएम प्रगती एक्स्प्रेस 9.23 तास

  • 12622 नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस 5.10 तास

  • 12130 हावडा-पुणे आजाद हिंद एक्स्प्रेस 6 तास 

  • 06510 बंगळुरू 2.35 तास

  • 03253 पटना-सिकंदराबाद स्पेशल 2.20  तास

  • 2722 हजरत निजामुद्दीन-हैदराबाद 4 तास

  • 12649 यशवंतपूर हजरत निजामुद्दीन 1 तास 

  • 12849 बिलासपूर-पुणे 2.30 तास 

  • 12102 शालिमार लोमती ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस 4.10 तास 

  • 12834 हावडा-अहमदाबाद 2.23 तास

  • 12833 अहमदाबाद-हावडा 5.44 तास


आता दुरंतो एक्स्प्रेसमध्ये मोफत बेडरोल


नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो एक्सप्रेसमध्ये (Mumbai CSMT Nagpur Duronto Express) पुढच्या महिन्यापासून बेडरोलची सुविधा मोफत मिळणार आहे. 25 फेब्रुवारीला यापूर्वी करण्यात आलेला करार रद्द होणार असल्याने 26 फेब्रुवारीपासून प्रवाशांना ही सुविधा मोफत उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. हावडा-पुणे-हावडा दुरंतो, हावडा-मुंबई-हावडा दुरंतो, राजधानी एक्सप्रेस, अजनी-पुणे-अजनीसह विविध मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांमध्ये बेडरोलसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात नाही. मात्र, नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून बेडरोलसाठी 250 रुपये घेण्यात येते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे. या संबंधाने प्रवासी तसेच प्रवासी-संघटनांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडेही तक्रारी केल्या आहेत. या संबंधाने प्रवाशांकडून विचारणा झाल्यास रेल्वेचे अधिकारी बेडरोलच्या माध्यमातून 2.50 कोटी रुपये जमवण्याचा युक्तिवाद करीत होते. मात्र, प्रवाशांचा रोष वाढतच असल्याने संबंधित अधिकारीही अनेकदा गप्प बसत होते. प्रवाशांच्या असंतोषाचा भडका उडू नये, म्हणून वर्षभराचा करार संपुष्टात आल्याने रेल्वे प्रशासनाने हा करार पुन्हा वाढवण्यास इन्कार केल्याचे समजते. त्यामुळे 26 फेब्रुवारीपासून प्रवाशांना मोफत बेडरोल मिळणार असल्याची माहिती आहे.


ही बातमी देखील वाचा...


एकीकडे वाढती गुन्हेगारी तरी नागपूर पोलीस आयुक्तालय सलग दुसऱ्या वर्षी राज्यात 'बेस्ट'