नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या अवतीभवती वाघांची भरीव संख्या असल्याने नागपूरला 'टायगर कॅपिटल' किंवा 'वाघपूर' ही संबोधतात. मात्र, या वाघपूराचा ताबा सध्या बिबट्याने घेतला आहे. गेले सहा दिवस नागपुरात शिरलेला बिबट वन विभागासोबत लपंडावच खेळत नाहीये तर सतत मार्गक्रमण करत सर्वांना बुचकळ्यातही पाडत आहे. या बिबट्याचा अखेरचा दर्शन काल (2 जून) रात्री थेट विभागीय आयुक्त कार्यालयाच्या जवळ झाल्याने आता प्रशासकीय यंत्रणाही हादरली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा बिबट्या गेले सहा दिवस उपराजधानीत सर्वत्र फिरतोय. मात्र, शनिवारी पहाटे अडीच वाजता हा बिबट आयटी पार्क मधील 'ट्रस्ट' या सॉफ्टवेअर कंपनीच्या परिसरात काही सुरक्षा रक्षकांना दिसून आला. सीसीटीव्हीमध्ये बिबट भिंती वरून उडी मारून जातानाचे दिसून आले. या एकमेव पुराव्या शिवाय बिबट्याच्या नागपुरातील उपस्थितीचे ठोस पुरावे मिळालेले नाही. मात्र, तो नागपुरात असल्याचे आणि सतत त्याची जागा बदलत असल्याचे अप्रत्यक्ष पुरावे रोजच मिळत आहे.
बिबट्याचा नागपुरातील प्रवास
- 28 मे सकाळी साडे नऊ वाजता गायत्री नगरात नरेंद्र चकोले यांच्या घरात बिबट पहिल्यांदा दिसून आला. तिथे जवळच एका ठिकाणी त्याचे पायांचे ठसे ही आढळले.
- 29 मे च्या पहाटे अडीच वाजता बिबट आयटी पार्क मधील 'ट्रस्ट' या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना दिसला. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये ही तो दिसून आला.
- 31 मे च्या सकाळी बिबट पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या परिसरात दिसला. त्या ठिकाणी त्याने हल्ला करून एका कुत्र्याला जखमी ही केले होते.
- 31 मे च्या दुपारी बिबट महाराज बाग प्राणी संग्रहालयाच्या पाठीमागील भागात तिथल्या महिला कर्मचाऱ्याला दिसून आला.
- 1 जूनच्या सकाळी महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या शेजारी नाल्याच्या काठावर बिबट्याने डुकराची शिकार केल्याचे आढळून आले.
- 2 जूनच्या रात्री बिबट्याला सिव्हिल लाईन्स परिसरात फॅमिली कोर्टासमोरून रस्ता ओलांडून विभागीय आयुक्त कार्यालय जवळच्या झाडीत शिरताना एका वाहनचालकाने पाहिले.
एवढेच नाही तर काही वन कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळेला बिबटचा आवाज ऐकल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बिबट जरी दिसून येत नसला तरी तो नागपुरात असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे..
वन विभागाने गेल्या सहा दिवसात बिबटला शोधण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. वन कर्मचारी दिवस रात्र त्याचा शोध घेत असून प्रशिक्षित कुत्र्यांची मदत ही घेतली जात आहे. मात्र, बिबट त्याचे मूळ स्थान गोरेवाडा जंगलातून बाहेर निघायापासून नागपुरात ठिकठिकाणी असलेल्या मोठ्या नाल्यांचा आणि त्याच्या अवतीभवती असलेल्या दाट झाडीचा वापर करून पुढे पुढे सरकत आहे. तसेच त्याने नागपुरात शिरताना पत्करलेला मार्ग परत जाण्यासाठी निवडलेला नाही. तो नाल्यांच्या माध्यमातूनच नव्या मार्गाने जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावून ही वन विभागाला यश मिळालेले नाही.
विशेष म्हणजे सध्या या बिबट्याने जो मार्ग पकडला आहे.. त्याच मार्गावर पुढे जाऊन तो सेमीनेरी हिल्सच्या दिशेने जाऊन राज्यपालांचे उपराजधानीतले शासकीय निवास स्थान असलेले राजभवन परिसरात जाऊ शकतो आणि जर त्याने तेलंगखेडी चे मार्ग धरले तर तो मुख्यमंत्रीचे शासकीय निवास स्थान असलेल्या रामगिरीच्या परिसरात जाऊ शकतो.. हे दोन्ही परिसर ही झाडी झुडुपांनी व्यापलेले असल्याने तिथे त्याला शोधणे जिकिरीचे ठरणार आहे.