Nagpur News : उन्हाळा असल्याने गारवा मिळवण्यासाठी अनेक जणांची पावलं आरोप स्विमिंग पूलकडे (Swimming Pool) वळतात. परंतु स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं नागपुरातील (Nagpur) एका डॉक्टरच्या जीवावर बेतलं आहे. उन्हाळी स्विमिंग शिबिरात एका डॉक्टराचा स्विमिंग पूलमध्ये पोहत (Swimming) असताना बुडून मृत्य झाला. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथे काल (31 मे) ही घटना घडली. डॉ. राकेश दुधे असं मृत डॉक्टरचं नाव आहे.
पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, नाकातोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध
डॉ. राकेश दुधे हे काल सायंकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. ही बाब त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी डॉ. राकेश दुधे यांना स्विमिंग पूलच्या बाहेर काढलं. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद पडले होते. पुढील तपासासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रशिक्षक काय करत होते?
दरम्यान उन्हाळी स्विमिंग शिबीर सुरु होतं. त्यामुळे आजूबाजूला जीवरक्षक तसंच प्रशिक्षक असणं गरजेचं असतं. त्यामुळे डॉक्टर राकेश दुधे बुडत असताना तिथले जीवरक्षक आणि प्रशिक्षक काय करत होते हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तीन वर्षांपासून बंद असलेला स्विमिंग पूल नुकताच सुरु
तत्पूर्वी हा स्विमिंग पूल मागील तीन वर्षांपासून बंद होता. यावर्षी मार्च महिन्यातच कळमेश्वर नगरपरिषदने स्विमिंग पूल नव्याने सुरु केला. परंतु स्विमिंग पूल सुरु होऊन काही महिने होत नाही तोपर्यंत ही दुर्घटना घडली. सध्या या स्विमिंग पूलच्या देखरेखीची जबाबदारी साई अॅक्वाटेक या कंपनीकडे आहे.
पुण्यात 16 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
मदर्स डेच्या दिवशीच स्वत:च्या लेकाचा मृत्यू पाहण्याची वेळ पुण्यातील एका आईवर आली. साधना स्कूलच्या जलतरण तलावात पोहताना एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हडपसर येथील माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे हा साधना शाळेतील नववीत शिकणारा विद्यार्थी पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. शनिवारी (13 मे) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा स्विमिंग पूलमध्ये शिरला तर त्याचे काकाही त्याच्यासोबत सामील झाले होते. कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले की तो तलावात बुडाला आहे. उपस्थित इतरांनी कृष्णाला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. प्रयत्न करुनही डॉक्टरांना त्याला वाचवता आलं नाही आणि त्यांनी कृष्णाला मृत घोषित केलं.
हेही वाचा