Nagpur News: नागपूर (Nagpur) शालेय क्रीडा स्पर्धेतील अपयशामुळे नैराश्येतून धावपटूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. निखिल तराळे असं आत्महत्या केलेल्या मृत धावपटूचं नाव असून तो 16 वर्षांचा होता. त्यानं शेतातील कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. मानकापूर येथील क्रीडा संकुलनात जिल्हास्तरीय स्पर्धेत निखिलनं चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांची चंद्रपूर (Chandrapur) येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेकरता निवड झाली होती. मात्र चंद्रपूरातील विभागीय स्पर्धेत त्याला अपयश आल्यानं त्याचं मनोधैर्य खचलं होतं. त्याच नैराश्येतूनच त्यानं शेतात कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील (Maharashtra News) नागपुरातील विभागीय क्रीडा स्पर्धेत 16 वर्षीय मुलानं शर्यतीत पराभूत झाल्यानंतर आत्महत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी यासंदर्भात माहिती दिली.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं की, "16 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत पराभव झाल्यानंतर निखिल घरी परतला. दहावीचा विद्यार्थी तणावाखाली होता आणि शनिवारी (17 डिसेंबर) सायंकाळी त्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शर्यत हरल्यानंतर तो खूप अस्वस्थ होता. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे."
NCRB नं जाहीर केली विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशभरात अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे करिअरमध्ये यश न मिळाल्यानं तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. कोटा, राजस्थान, ज्याला देशाचं कोचिंग हब म्हटलं जातं, तिथे वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
कोटा व्यतिरिक्त देशभरात अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे तरुण विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत यश न मिळाल्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून आत्महत्या प्रकरणांबाबत जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
NCRB नं जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांची संख्या सुमारे 4.5 टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रात एकूण 13,089 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रासह या पाच राज्यांतील आहेत. एनसीआरबीनं आपल्या अहवालात सांगितलं की, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.