Nagpur News : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान नागपुरात (Nagpur) होणाऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यासाठी 500 अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर शुक्रवारी (23 सप्टेंबर) हा सामना होणार आहे. नागपूर शहरापासून जामठापर्यंतच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावली जाईल अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.


नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या जामठा स्टेडियमवर मॅचच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते, हा आजवरचा अनुभव आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा वेगळे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मॅच पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करावा. यंदा कार पार्किंग स्टेडियमपासून दीड किलोमीटर अंतरावर असल्याने प्रेक्षकांनी शक्यतो कार ने येणे टाळावे, कारने मॅच पाहण्यासाठी यायचे असल्यास ड्रायव्हरचा वापर करावा, अशा सूचनाही नागपूर पोलिसांनी केल्या आहेत.


मॅच संपल्यानंतर जामठा स्टेडियमपासून नागपूर शहराच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ग्रीन कॉरिडोर निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे रात्री साडेनऊ ते मध्यरात्री बारा दरम्यान या मार्गावर कोणालाही वाहनांची पार्किंग करता येणार नाही, असेही नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपूर मेट्रोची सेवा खापरीपर्यंत उपलब्ध असून मॅचच्या दिवशी मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या सुरु राहतील. तर खापरी मेट्रो स्टेशनपासून जामठा स्टेडियमपर्यंत विशेष बस सेवाही उपलब्ध राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.


खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त  
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी (21 सप्टेंबर) चार्टड विमानाने नागपुरात दाखल झाला आहे. रेडिसन ब्लू आणि ली मेरिडियन या हॉटेलमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंचा मुक्काम आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान 21 ते 24 सप्टेंबर असा मुक्काम दोन्ही संघाचा नागपुरात असेल. मैदानावरील सराव आणि सामन्यांमध्ये संघासोबत पोलिसांची टीम बंदोबस्तात राहिल.


असा राहणार पोलीस बंदोबस्त!
- 7 पोलिस उपायुक्त, 10 सहायक पोलिस आयुक्त
- 35 पोलिस निरीक्षक, 4 मोबाईल सर्विलन्स व्हॅन
- 138 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक
- 1600 पुरुष कर्मचारी व 400 महिला कर्मचारी
- 400 वाहतूक पोलिस कर्मचारी, स्पेशल क्यूआरटी पथक
- मॅच फिक्सिंग व जुगारावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक


संबंधित बातमी


IND vs AUS T20 in Nagpur : जामठा ते रहाटे कॉलनी मार्ग 'ग्रीन कॉरिडॉर', क्रिकेट बुकींवर करडी नजर