Nagpur News : राज्यातील सत्तांतरानंतर एकीकडे पक्ष वाढविण्यासाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा विदर्भ दौरा सुरु आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत नुकतीच सभा घेतली. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि मनसे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले. यातच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. आजही मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचले. बाळासाहेबांचे नाव न घेता केवळ बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे हे पाणबुडे आहेत, अशा शब्दांत नाव न घेता देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  


उद्धव ठाकरे यांना भिती कशाची?


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. अमरावतीच्या विश्रामगृहात (Raj Thackeray in Amravati) सध्या त्यांचा मुक्काम आहे. एका महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेनेने दिले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना संदीप देशपांडे म्हणाले, एका महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा, असे ते म्हणतात. मग ते सत्तेत असताना निवडणूक का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) की, कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. कारण बाळासाहेब म्हणजे एक विचारधारा आहे आणि विचारधारेवर कुटुंबीयांचा किंवा कुण्या एकाचा हक्क नसतो, तर त्यावर सर्वांचा अधिकार आहे. ही विचारधारा पुढे घेऊन जाणार त्यांचा खरा अनुयायी आहे. आता त्यांना भिती कशाची आहे, हे कळत नाहीये. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे हे लोक आहेत. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. पण दसरा मेळाव्यामध्ये सांगण्यासाठी बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे आहेत का? हे त्यांनी तपासावे मग मेळाव्यासाठी धावपळ करावी. विचारधारा सोडून सत्ता मिळवायची आणि वल्गना करायच्या, याला काही अर्थ नाही, असेही संदीप देशपांडे म्हणाले. 
 
राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे पक्षाला 'बूस्ट'


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा चांगला झाला. या दौऱ्यातून अमृत निघेल. पुढच्या काळात मनसे ला मोठं यश मिळेल. पुढच्या एका महिन्यात मनसेच्या एक हजार शाखा आम्ही सुरू करू. या दौऱ्यात पूर्व आणि पश्‍चिम विदर्भातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागावे, अशा सुचनादेखील ठाकरेंनी दिल्या असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या