Nagpur Mahavikas Aghadi Vajramooth Sabha: महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज भाजपच्या बालेकिल्ल्यात पार पडली. या सभेकडे उद्धव ठाकरे काय बोलणार? यापेक्षा अजितदादा (Ajit Pawar) काय बोलणार याकडे सर्वाधिक लक्ष लागून होते. मात्र, नागपुरात सभेतील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची तोफ धडाडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वज्रमूठ सभेत विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आमदार अनिल देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केले. महाविकास आघाडीतील सभेच्या सूत्रानुसार प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांची भाषणे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, राष्ट्रवादीकडून आजच्या भाषणात जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी भाषण केले. 


अजित पवार अनेक कारणांनी चर्चेत


गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत आमदार अपात्र ठरल्यास राष्ट्रवादीच्या आमदारांचा गट घेऊन जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पीएम मोदींची डिग्री तसेच अदानी मुद्यावरून अजित पवार यांनी वेगळी भूमिका अजित पवारांनी राजकीय भूवया उंचावल्या होत्या. मोदींमुळे भाजप जगात पोहोचल्याचेही अजित पवार म्हणाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी फडणवीस यांचा कोणताही थेट उल्लेख केला नव्हता. या मुद्यावरून त्यांना विचारण्यात आले असता नागपुरातील सभेत नावासह बोलू, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले होते. आज नागपुरात पोहोचल्यानंतरही त्यांनी सरकार स्थिर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले, माझ्यावर सगळ्यांचं एवढं का प्रेम उतू चाललं आहे? उदय सामंत बोलले, दादा भुसे बोलले, त्यानंतर गुलाबराव पाटील बोलले. या सगळ्यांचे माझ्यावर प्रेम का उतू चाललं आहे? हे कळत नाही.  मात्र, दुसरीकडे अंबादास दानवे तसेच बाळासाहेब थोरात यांनी सरकार कोसळणार असल्याची प्रतिक्रिया दिली. 


या सर्व पार्श्वभूमीवर नागपूरच्या सभेत अजित पवार या सर्व प्रश्नांना उत्तरे देणार का? याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र त्यांनी भाषण न केल्याने सर्व प्रश्नांची चर्चा होतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात पहाटेच्या शपथविधीसारखा प्रयोग पुन्हा होऊ शकतो का? याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे म्हटले होते. 


अजित पवार यांनीच खुलासा करायला हवा 


दुसरीकडे, संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील 'रोखठोक'मध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपत सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा असे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. 


इतर महत्वाच्या बातम्या