नागपूर : विज्ञान खूप पुढं गेलं आहे, विज्ञानातून अनेक चमत्कार मानवाने घडवले आहेत असे नेहमीच म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातून सातत्याने अशा चमत्काराचे दाखलेही दिले जातात. अवघड आणि जटील शस्त्रक्रिया करुन रुग्णांना जीवनदान मिळाल्याच्या कित्येक घटना इतिहासात नोंद झालेल्या आहेत. त्यामुळे, आता ह्रदयरोपण, किडनीरोपण, लिव्हर रोपणाची शस्त्रक्रिया देखील सहज होत आहेत. मात्र, नागपूरच्या (nagpur) लता मंगेशकर रुग्णालयात (Hospital) प्लस्टिक सर्जनच्या चमूने मध्य भारतात पहिल्यांदाच एका तरुणाचे संपूर्ण लिंग (penis) एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. संबंधित रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे त्याचे लिंग गमवावे लागले होते. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर तो रुग्ण आता पूर्ण बरा झाला आहे.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट व मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची ) नळी पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगाला रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यास सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 तास लागले. मात्र, 10 तासाच्या अथक प्रयत्नानंतर रुग्णाची लिंग प्रत्यारोपणाची प्लास्टिक सर्जरी यशस्वी झाली आहे.
"मायक्रोव्हस्क्युलर" शस्त्रक्रिया
दरम्यान, नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांकडून करण्यात आलेली शस्त्रक्रिया "मायक्रोव्हस्क्युलर" शस्त्रक्रिया प्रकारामध्ये मोडते. "मायक्रोव्हस्क्युलर" शस्त्रक्रिया ही शरीरात ज्या रक्तवाहिन्य अत्यंत लहान आणि सूक्ष्म असतात त्या रक्तवाहिन्यांना विशेष उपकरणांचा मदतीने पुनर्रचनात्मक पद्धतीने जोडल्या जाते, त्याच शस्त्रक्रियेला मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया असे म्हंटले जाते. डॉ.जितेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात डॉ.समीर महाकाळकर, डॉ.अश्विनी पंडितराव, डॉ.देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ.कंवरबीर, डॉ.पल्लवी या चमूने ही अवघड कामगिरी पार पाडली.