नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख अजूनही तुरुंगात आहेत. त्यांची सुटका केव्हा होईल हे अद्याप निश्चित नाही. मात्र नागपूर जिल्ह्यात खास करून अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांचे वारसदार म्हणून त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना निवडले आहे का? असं म्हणण्याचं कारण म्हणजे गेले काही महिने अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र सलील देशमुख हेच काटोल मतदारसंघात सर्व काम सांभाळत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या विदर्भ आणि नागपूर दौऱ्यात सलील देशमुखांची सक्रियता लक्ष वेधून घेत आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याचे माजी गृहमंत्री आणि विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. तेव्हा त्यांना झालेली अटक अल्पकालीन ठरेल आणि ते लवकरच बाहेर येतील असंच सर्वांना वाटले होते. किमान त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तसेच दावे केले जात होते. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या अटकेला नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यामुळे ते तुरुंगातून केव्हा बाहेर येतील याबद्दल अद्यापही कुठलीच निश्चितता नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा काटोल विधानसभा मतदारसंघ लोकप्रतिनिधीविना झाला आहे.


गेले काही महिने अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र सलील देशमुख यांनी मतदारसंघातील कामेच आपल्या हातात घेतली नाहीत तर अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात ते एका लोकप्रतिनिधींच्या स्वरूपात ते वडिलांच्या जागी मतदारसंघात सतत फिरत आहेत. सलील देशमुख वडिलांच्या मतदारसंघातील एका गटातून नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहे हे विशेष. त्यामुळे राजकीय विश्लेषकांना अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा पर्याय म्हणून सलील देशमुख यांना पुढे केल्याचे वाटत आहे.


एबीपी माझाने या संदर्भात सलील देशमुख यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या अनिल देशमुख यांचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे सलील देशमुख यांच्या पाठीशी असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली.


एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनेही विदर्भाकडे खास करून अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाकडे विशेष लक्ष पुरविल्याचे चित्र आहे. गेले काही महिने शरद पवार, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते सातत्याने नागपूर जिल्ह्याच्या खास करून काटोल मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी आले.


यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या आगमनावेळी जसे अनिल देशमुख विमानतळावर उपस्थित राहायचे, दौऱ्यात सक्रिय राहायचे आता त्या ठिकाणी सलील देशमुख सातत्याने दिसून येतात. नुकतंच अजित पवार यांनीही विदर्भाचा दोन वेळेला दौरा केला. दोन्ही वेळेला अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत सलील देशमुख हेच त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करताना दिसून आले. 


राजकारणात मतदारांच्या सहानुभूतीचा फायदा उचलणे हाही रणनीतीचा भाग असते. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या विरोधात झालेल्या कारवाईचा ग्रामीण भागात सहानुभूतीच्या अनुषंगाने फायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही पर्याय म्हणून समोर करू शकते असंही राजकीय विश्लेषकांना वाटतंय.


तिकडे भाजप आणि काँग्रेस पक्षानेही अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदारसंघात आपला जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील काटोल या मतदारसंघातील घडामोडी लक्षवेधी ठरू शकतात.