Nagpur Weather : नागपुरात मंगळवारपासून (3 जानेवारी) आकाशात जमलेल्या ढगांच्या गर्दीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी घसरण झाली आहे. बुधवारी (4 जानेवारी) सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले होते आणि नागपुरात धुक्याची चादर पसरली होती. दिवसाचा पारा 24 तासांत 4.4 अंशांनी आणि सरासरीपेक्षा 6.5 अंशांनी खाली घसरला. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरली होती. दिवसाचे तापमान घसरले; पण रात्रीच्या पाऱ्याने 5.2 अंशांची मोठी उसळी घेतली आहे.


बुधवारी दिवसभर नागपूरच्या वातावरणात गुलमर्ग, कुलूमनाली आणि माथेरानमध्ये असल्याचा फील येत होता. अचानक घसरलेल्या पाऱ्याने गारठा चांगलाच वाढला होता. त्यामुळे नागपूरकरांना दिवसा काही होईना, इतक्या दिवसातून थंडीची जाणीव झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, बुधवारी दिवसाचे तापमान 24 तासांत 5.4 अंशांनी घसरुन तब्बल 21 अंशांवर खाली आले. सरासरीपेक्षा ते 6.5 अंशांनी कमी होते. पुढचे दोन दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसाचा पारा घसरला असला तरी रात्रीच्या पाऱ्याने मोठी उसळी घेतली आहे. बुधवारी 17.2 अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा 5.2 अंशांनी अधिक आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात बुधवारी दिवसाच्या तापमानात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.


धुक्यामुळे पाच विमाने विलंबाने


दाट धुक्यामुळे बुधवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दोन विमान उशिराने दाखल झाले. पुणे, इंदूर आणि हैदराबाद येथून येणारे विमानही धुक्यामुळे उशिराने आल्याची माहिती आहे. रायपूर येथे जाणारे दिल्ली येथून निघालेले विमान नागपूर विमानतळावर (Dr Babasaheb Ambedkar International Airport) उतरवण्यात आले. रायपूर येथे धुके अधिक असल्याने वैमानिकाला नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रायपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनाने पोहोचवण्यात आले. विमाने नागपुरात उशिरा आल्याने ते उड्डाणही उशिराने झाले. परिणामी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.


शेकोटीचा आधार


दिवसभर थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढलेला होता. त्यापासून दिलासा मिळवण्यासाठी दिवसाच अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या होत्या. जसजशी संध्याकाळ झाली तसतशी शेकोट्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. थंडीमुळे अनेकांनी घरातच राहणं पसंत केलं.


शहरात पावसाचा अंदाज


मंगळवारी वर्धा येथे पाऊस पडला. भंडारा-गोंदियातही हलका पाऊस झाला. नागपुरातही आज, गुरुवारी (5 जानेवारी) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच थोडेफार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


ही बातमी देखील वाचा...


बॉम्ब निकामी करण्यासाठी डीआरडीओचा 'दक्ष' सज्ज ; विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे विशेष आकर्षण