Nagpur Hit And Run Case: नागपूर : नागपूरच्या (Nagpur Accident) दिघोरी नाक्यावरील 'हिट अँड रन' (Hit And Run Case) प्रकरणातील चिमुकलीची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. वडिलांनंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, नागपुरात सोमवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गाडीखाली चिरडलं होतं. 


सोमवारी नागपूरच्या दिघोरी नाक्यावरील 'हिट अँड रन' प्रकरणातील चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झालाय. पित्यानंतर मुलीच्या मृत्यूनं कुटुंबावर मोठा आघात झालाय. या अपघातातील मृतांची संख्या आता तीनवर गेली आहे. सोमवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बेदारकपणे कार चालवून अपघात केला होता. 


मद्यधुंद तरुणाची अद्याप ब्लड टेस्ट नाही 


नागपूरच्या दिघोरी टोल प्लाझाजवळ एका मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेलं होतं. ही घटना घडून आज 3 दिवस उलटले असले तरी, अद्याप पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पाच मद्यधुंद मित्रांचे रक्ताचे नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (आरएफएसएल) पाठवलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. 


अपघाताची संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरात कैद 


अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही कार इतकी वेगवान होती की या अपघातात रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या काही दुचाकी अक्षरक्ष: उडवल्या आहेत. तर अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार यात चार जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून पुढील तपासाअंती अधिक माहिती कळू शकणार आहे. मात्र, या घटनेने पुन्हा शहर एकदा हादरले आहे.