Nagpur News: उड्डाणपूलांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता आणखी एका आधुनिक उड्डाणपुलाने सजणार आहे. अमरावती महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेटपर्यंतचा 2.85 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल पूर्णत्वास आला असून लवकरच या पुलाचे लोकार्पण होणार आहे. या उड्डाणपुलामुळे अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडी टाळून अधिक वेगाने प्रवास करता येणार आहे.

Continues below advertisement

अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठा दिलासा

सध्या नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांना लॉ कॉलेज चौक, रवी नगर चौक, भरतनगर चौक आणि फुटाळा तलावाजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नव्या उड्डाणपुलाच्या वापरामुळे या चौकांवरील ताण कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विशेष म्हणजे वाडी आणि पुढे अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल मोठा दिलासा ठरणार आहे.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा पूल उभारला आहे. सुमारे 191 कोटी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या या चार लेनच्या उड्डाणपुलाची लांबी 2.85 किलोमीटर आहे. ‘नागपूर-अमरावती महामार्ग ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम’अंतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.या उड्डाणपुलाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात आले आहे. 

Continues below advertisement

नागपूरच्या पायाभूत सुविधांना बळ

गेल्या काही वर्षांत नागपूर शहरात उड्डाणपुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येला आणि वाहनांच्या संख्येला तोंड देण्यासाठी या उड्डाणपुलांची मोठी मदत होत आहे. नव्या पुलामुळे अमरावती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासह पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फायदा होणार आहे, कारण गर्दीमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी होईल. लवकरच या पुलाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर हा पूल नागपूरकरांच्या सेवेत उपलब्ध होईल. नव्या उड्डाणपुलामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील प्रवाशांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येईल.

हडकोसोबत करार ₹11,300 कोटींचा वित्तपुरवठा

एनएमआरडीए आणि हडको यांच्यातील कराराअंतर्गत हुडको ₹11,300 कोटी इतका निधी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये ₹6500 कोटी नवीन नागपूरचे भूसंपादन तसेच व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा विकास व ₹4800 कोटी नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठीच्या भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या निधीमुळे 'नवीन नागपूर' प्रकल्पाची संकल्पना आणि 'नागपूर बाह्य वळण रस्ता' यांसारखे पायाभूत प्रकल्प वेगाने आकार घेतील.