नागपूर : नागपुरात गुन्हेगारी (Nagpur Crime) थांबण्याचं नाव घेत नाही. एकाच दिवसात चार हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, मागील 24 तासात पुन्हा दोन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत हे खून झाले. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीचा खून केला. शिवाय दोन्ही हत्या या कौटुंबिक कारणावरुन झाल्याची माहिती आहे. दोन्ही घटनांमधील आरोपी पतींनी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
पती कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केली
पहिली घटना कोराडी पोलीस स्टेशन हद्दीतील शंभू नगर परिसरात घडली. या घटनेत सेवानिवृत्त शिक्षेकेची पतीने हत्या केली. मुकुलकुमारी सिन्हा असे 63 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेचे नाव आहे. त्यांचे 66 वर्षीय पती पुरुषोत्तम सिन्हा यांनी त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. मुकुलकुमारी आणि पुरुषोत्तम या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. त्यामुळे एकाच घरात दोघेही वेगवेगळ्या मजल्यावर राहत होते. काल (13ऑगस्ट) दोघांमध्ये जुन्या वादावरुन पुन्हा भांडण सुरु झाले. रागाच्या भरात पुरुषोत्तम यांनी मुकुलकुमारी यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ते घरातून फरार झाले. रात्री उशिरा त्यांनी कोराडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः आत्मसमर्पण केले. पोलिसांनी पत्नीचे हत्येच्या आरोपात पुरुषोत्तम सिन्हा यांना अटक केली आहे. पुरुषोत्तम सिन्हा स्वतः केंद्र सरकारच्या सीएमपीडीआय या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत.
झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर मारला
तर दुसरी घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील टेकऑफ सिटी परिसरात घडली. या घटनेत पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंड मारुन खून केला. नयर शफी खान असं मृत महिलेचं नाव आहे. नयर शफी खान आणि तिचा पती समीर मोहम्मद अन्सारी हे दोन वर्षांपासून फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. त्या वादामुळे पती समीर मोहम्मद अन्सारी हा रागात होतात. त्यातूनच त्याने काल (13 ऑगस्ट) रात्री दीड ते दोनच्या सुमारास पत्नी झोपली असताना तिच्या डोक्यावर सिलेंडर मारुन हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा
Nagpur Crime : हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला, एकाच दिवसात चार जणांचा खून