नागपूर: रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तरुणांच्या ट्रॉपिकल अफेयर नावाच्या पार्टीवर धाड टाकून नागपूर पोलिसांनी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. नागपूर वर्धा रोडवर जामठा क्रिकेट स्टेडियमच्या जवळ एका खासगी फार्महाउसवर सुरु असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सहभागी झाले होते.
रविवारी मध्यरात्री पोलीस या फार्महाऊसवर पोहोचले तेव्हा डीजेच्या तालावर शेकडो तरुण-तरुणी दारूच्या नशेत झिंगत नाचत होते. दारूसह या पार्टीत ड्रग्सचा वापर सुरु होता का याचाही तपास आता पोलीस करीत आहेत.
नागपूर वर्धा रोडवर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामठा क्रिकेट स्टेडियमच्या जवळ एका खाजगी फार्महाउसवर मध्यरात्रीनंतर एक पार्टी सुरु असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. बक्कळ एंट्री फी वसूल करून काहींनी तरुणाईसाठी ट्रॉपिकल अफेयर नावाने ही पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्टीसाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी घेण्यात आली होती. मात्र तरीही मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरु असल्याने झोन 3 चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मध्यरात्रीनंतर फार्महाऊसवर धाड टाकली.
यावेळी शेकडो तरुण तरुणी दारूच्या नशेत डीजेच्या तलवार नाचताना दिसून आले. अनेकांना त्यांच्या कपड्यांचं भान देखील राहिलं नव्हतं. काही जण तर अर्धनग्न अवस्थेत या पार्टीत सहभागी झाले होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सर्वजणच थबकले. आयोजकांकडे रात्री दहा पर्यंतची पोलीस परवानगी असताना उशिरापर्यंत पार्टी सुरु ठेवण्यात आली होती. तर डीजेसाठी फक्त परवानगी मागण्यासाठी दिलेला अर्ज देण्यात आला होता. मात्र त्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती.
विशेष म्हणजे एक मोठी एक्सयूव्ही भरून मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला असून या पार्टीत काहींनी ड्रग्सचा वापर केला होता का याचाही तपास पोलीस करीत असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या या पार्टीची स्थानिक पोलिसांना कशी काय माहिती नव्हती या कारणास्तव हिंगणा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.