नागपूरः राज्यात मुंबई-पुण्याच्या पावलावर पाऊल ठेवून नागपुरातही 'विकेंड पार्ट्यां'ना सुरुवात झाली आहे. सर्वच नियमांना तिलांजली देत शेकडोंच्या संख्येत मद्यधूंद तरुणाईच्या पार्टीवर उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पार्टीमध्ये हजाराच्या जवळपास तरुण जमले होते. या फॉर्महाऊसवर सुरु असलेल्या कारवाईबाबत स्थानिक पोलिस ठाण्याला कुठलीही कल्पना न देत ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी हिंगणा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाची बदली केली. मात्र दुसरीकडे शहरातील कल्बमध्येही रात्रभर पार्ट्यासुरु असताना त्यांच्यावर पोलिसांची मेहरनजर का असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.


नागपूरात विकेंड पार्ट्यांची क्रेझ तरुणाईमध्ये वाढली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तर शहरातील लाऊंज फुल्ल असतात. यासह शहराच्या नजिक असलेल्या पबमध्येही याच प्रकारची गर्दी विकेंडला होत असते. याचाच फायदा घेत हजारो रुपये प्रवेश शुल्क घेऊन 'ट्रॉपिकल अफेअर' मोठ्या कॉन्सर्टचे आयोजन वर्धा मार्गावरील गिरनार फार्म या खासगी फार्महाऊसवर करण्यात आले होते. याठिकाणी सायंकाळी पाच ते रात्री दहा दरम्यान कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली होती. याशिवाय डिजे वाजविण्याच्या परवानगीसाठी तर फक्त पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जाच्या पोचपावतीवरच कार्यक्रम सुरु असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 


या पार्टीत मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सहभागी झाले होते. जेव्हा काल मध्यरात्री पोलीस या फार्महाऊसवर पोहोचले तेव्हा डीजेच्या तलवार शेकडो तरुण तरुणी दारूच्या नशेत झिंगत नाचत होते. दारू सह या पार्टीत ड्रग्स चा वापर ही सुरु होता का याचाही तपास आता पोलीस करीत आहेत. नागपूर वर्धा रोडवर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामठा क्रिकेट स्टेडियमच्या जवळ एका खाजगी फार्महाउस वर मध्यरात्रीनंतर ही एक पार्टी सुरु असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. या पार्टीसाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी घेण्यात आली होती. मात्र तरीही मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरु असल्याने झोन 3 चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मध्यरात्रीनंतर फार्महाऊसवर धाड टाकली.


कपड्यांचेही नव्हते भान
शेकडो तरुण तरुणी दारूच्या नशेत डीजेच्या तलवार नाचताना दिसून आले. अनेकांना त्यांच्या कपड्यांचा भान देखील राहिला नव्हता. काही जण तर अर्धनग्न अवस्थेत या पार्टीत सहभागी झाले होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सर्वजणच थबकले. आयोजकांकडे रात्री दहा पर्यंतची पोलिस परवानगी असताना उशिरापर्यंत पार्टी सुरु ठेवण्यात आली होती. तर डीजेसाठी फक्त परवानगी मागण्यासाठी दिलेला अर्ज देण्यात आला होता. मात्र त्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती. 


मोठी एक्सयूव्ही भरून मद्यसाठा
विशेष म्हणजे एक मोठी एक्सयूव्ही भरून मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या पार्टीत काहींनी ड्रग्स चा वापर केला होता का याचाही तपास पोलीस करीत असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या या पार्टीची स्थानिक पोलिसांना कशी काय माहिती नव्हती या कारणास्तव हिंगणा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सोबतच आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ही पोलीस आयुक्तांनी दिली.