Nagpur Crime News : उपराजधानीत नव्या वर्षाची सुरुवात खुनाच्या घटनेने झाली आहे. पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर रविवारी (1 जानेवारी) दिवसाढवळ्या एका युवकाचा खून करण्यात आल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे.


राजेश विनोद मेश्राम (वय. 25 वर्षे, रा. समतानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मनोज नारायण गुप्ता (वय 30 वर्षे, कपिलनगर), शुभम ऊर्फ दादू हिरामण डोंगरे (वय 30 वर्षे, संतानगर), विपिन ऊर्फ जॅकी रामपाल विश्वकर्मा (वय 27 वर्षे, बाबादीपनगर), पीयुष भैसारे (वय 22 वर्षे, रा. वैशालीनगर) अशी अटक (Nagpur Police) झालेल्या आरोपींची नावे असून इमरान वहिद मलिक (ताजनगर) हा आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. 


राजेश मेश्राम वाहन चालक होता. त्याची मनोजशी जुनी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. मनोज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो राजेशचा काटा काढण्याच्या तयारीत होता. राजेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही. रविवारी सकाळी मनोज आपल्या साथीदारांसह शस्त्र घेऊन राजेशच्या घरी पोहोचला. कुटुंबीयांनी राजेश कामावर गेल्याचे त्याला सांगितले. मनोजने राजेशचा भाऊ राजू मेश्रामची पत्नी मनप्रीतला राजेशचा खून करण्याची धमकी दिली.


त्यानंतर मनोज आणि त्याचे साथीदार निघून गेले. राजेश सकाळी 10.30 वाजता बाइकवर वैशालीनगर सिमेंट रोडवर पोहोचला. तेथे बाईकवरुन उतरुन तो खर्रा घेत होता. तेवढ्यात मनोज आपल्या साथीदारांसोबत कार क्रमांक MH 49 AS 1980 ने तेथे पोहोचला. त्यांनी राजेशला घेराव घातला. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळी लहान मुले खेळत होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुले आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्यामुळे ते पळत सुटले. 


दरम्यान राजेशही जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका घराच्या गच्चीवर गेला. हे पाहून हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी या घटनेची पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी राजेशला रुग्णालयात पोहोचवले. त्यावेळी त्याचा श्वास सुरु होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा जीव गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपी आणि त्यांची कार दिसली. त्यावरुन पोलिसांनी शोध घेत आरोपींना अटक केली. तसेच फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.


'तू कल मुझे ऐसा क्यू बोला' म्हणत केले वार


मनोज आणि त्याचे साथीदार शस्त्रासह येत असल्याचे दिसताच, राजेश पळायला लागला. यावेळी त्यांनी त्याचा पाठलाग करत पकडले. 'तू कल मुझे ऐसा क्यों बोला' असे म्हणत, त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. राजेश आपला जीव वाचवण्यासाठी काही अंतरावर धावत गेला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने राजेशचा अखेर मृत्यू झाला.


चहाटपरी बंद पाडल्यापासून सुरु होता वाद


राजेश वर्षभरापूर्वी पाण्याच्या कॅनची विक्री करण्याचे काम करायचा. त्यापूर्वी त्याने छावणी परिसरात चहाची टपरी टाकली होती. मात्र, मनोज आणि त्याचे मित्र त्याला त्रास द्यायचे. त्यातून त्याची चहाटपरीही बंद पाडली होती. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. कालही त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून राजेशने त्यांना बघून घेईल, अशी धमकी दिली होती. त्याचाच राग मनात धरुन पाचही जणांनी त्याचा गेम केल्याची माहिती समोर आली आहे.


पोलिसांच्या भूमिकेबद्दल चर्चांना उधाण



  • पाचपावली ठाण्याच्या परिसरात 25 डिसेंबरला शंकर कोत्तलवारचा खून करण्यात आला होता. त्याच्या चार दिवसानंतर दुसरी घटना घडली. 

  • पाचपावलीतील पोलिस धान्य माफिया सोनू, टेकाचा सट्टेबाज सलमान आणि सुपारी गुटख्याची माहिती घेण्यात व्यस्त आहेत. 

  • दोन महिन्यांपूर्वी डीबी पथकाचे मुख्य आणि त्यांचे कर्मचारी गुटखा-तंबाखूवर कारवाई करत होते. परंतु गुन्हेगारी रोखण्यात ते प्राधान्य देत नव्हते. अचानक डीबी पथकाच्या हृदय परिवर्तनामुळे वरिष्ठ अधिकारीही चिंतेत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. 

  • कोत्तलवारच्या खुनातही सुरुवातीला एक आरोपी आणि परांत उडवण्यावरुन वाद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच आरोपींना अटक करुन वैमनस्यातून खून झाल्याचे सांगण्यात आले.


ही बातमी देखील वाचा...


Religious Places Nagpur : सुट्ट्यांमध्ये बघावी अशी नागपूर जवळील धार्मिक स्थळे