नागपूर: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चर्चेत असतानाच आता नागपुरमध्ये हुंडाबळीची एक घटना पुढे आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 35 दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार मयुरी ठाकरे डाहुले हिचा अभिषेक डाहुले याच्यासोबत 25 एप्रिलला विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर अभिषेकचे वडील व आईने लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरवात केली.

नवीन लग्न आहे त्यामुळे काही दिवसात स्थिती सामान्य होईल असे वाटत असल्याने तिने वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणीची कल्पना दिली नाही. लग्नानंतर एकदा घरी आल्यानंतर मयुरीने  वडिलांना सांगितले असता वडिलांनी गटाच्या भीशीचे 20 हजार रूपये दिले. वडिलांकडे अतिरिक्त पैसे नसल्याने वडील हतबल होते. सासरच्या मंडळींचा पैशासाठी मयुरीचा जाच सुरु होता. शेवटी 30 जूनला मयुरीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्मत्या केली व सात जन्माची बेडी अवघ्या 35 दिवसात तुटली. या प्रकरणात बुट्टीबोरी पोलीसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले व दीर आदित्य डाहुले यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापुरातही गर्भवतीने जाचाला कंटाळून संपवलं जीवन

सोलापुरमध्ये (Solapur Crime News) देखील सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सासरकडच्यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या प्रकरणी आशाराणी भोसले हिचा मृत्यू नसून हत्या असल्याचा आम्हाला संशय आहे, असंही तिच्या माहेरच्यांनी म्हटलं आहे.(Solapur Crime News)   

कुटुंबियांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, मोठी मुलगी उशारणी हिचा ज्ञानेश्वर भोसले याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर त्याचा लहान भाऊ पवन यांनी आमची धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेलं आणि प्रेमाविवाह केला. मात्र मुलगी झाल्यापासून तीचा छळ सुरूच होता. अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करत आशाराणी हिला मारहाण केली जात होती. आशाराणी माहेरी निघून आल्यावर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी समजून सांगितल्याने आम्ही मुलीला नांदायला पाठवलेलं होतं. काल (मंगळवारी) तिने टोकाचा पाऊल उचललं. तिला तीन वर्षांची वैष्णवी नावाची चिमुकली मुलगी आहे, अशी माहिती देखील आशाराणीच्या कुटुंबियांनी दिली आहे. 

वैष्णवी हगवणे प्रकरणाची राज्यभरात चर्चा

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.