Nagpur News : प्रवचन ऐकण्यासाठी येणाऱ्या युवकानेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील पोद्दारेश्वर राम मंदिरातील (Ram Mandir) दानपेटी फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुकेश ऊर्फ मुक्कु गोपाल निहाय (वय 22, संत्रा मार्केट) असे गणेशपेठ पोलिसांनी (Nagpur Ganesh Peth Police) अटक केलेल्या दानपेटी फोडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दारूच्या व्यवसनातून त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
15 जानेवारीला रात्री पोद्दारेश्वर राम मंदिराची दानपेटी फोडून 35 हजार रुपये त्याने चोरून नेले होते. मंदिराचे विश्वस्त पोद्दार पुनीत पोद्दार यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी (Nagpur Police) चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यात सीसीटीव्हीच्या फुटेजवरूनही महत्त्वाचा सुगावा लागला नाही. तपासात पोलिसांना मुकेश नियमित मंदिरात येत असल्याची माहिती मिळाली. मुकेश विरुद्ध यापूर्वीही अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल आहे. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
काही दिवसांपासून पोद्दारेश्वर राममंदिरात प्रवचन सुरु आहे. प्रवचन ऐकण्यासाठी मुकेश मंदिरात येत होता. तो संत्रा मार्केट येथील एका फरसाणच्या दुकानात काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो नेहमीच आर्थिक तंगीत राहतो. दारूच्या व्यसनासाठी त्याला पैशांची गरज होती. प्रवचन ऐकताना त्याने दानपेटी फोडण्याचे ठरविले. त्याने मंदिरात ये- जा करण्याचा सुरक्षित रस्ता पाहिला. घटनेच्या वेळी मंदिराच्या मागील भागातून तो आत आला. दानपेटी फोडून पैसे घेऊन तो फरार झाला. मुकेशने चोरीची रक्कम दारू आणि इतर बाबीवर उडविल्याची माहिती दिली.
काय होती घटना...
सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील पोद्दारेश्वर राममंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी 15 जानेवारी रोजी 35 हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पोद्दारेश्वर राम मंदिरात गेल्या काही दिवसांपासून वाराणसीतील महाराजांचे प्रवचन सुरू होते. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास प्रवचन संपले. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पुनित यांनी मंदिर बंद केले. मध्यरात्री मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत आला. चारपैकी एका दानपेटीचे कुलूप तोडले. 35 हजारांची रोख काढून मंदिरातील एका पिशवीत चोरीची रोख रक्कम ठेवून चोरटा पसार झाला. मध्यरात्री पुजाऱ्याच्या मुलाला मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. मंदिराचे विश्वस्त पुनित रामकृष्ण पोद्दार (वय 57, रा. बजेरिया) यांना प्रकरणाची माहिती दिली होती. पुनित यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
ही बातमी देखील वाचा...