नागपूर : सायबर गुन्हेगार ऑनलाईन फ्रॉड करुन अनेकांच्या खिशाला चाप बसवत असतात मात्र, सायबर गुन्हेगारांनी यंदा नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाच्या खात्यातून ते पाऊणे तीन लाख रुपए गायब केले आहे. संबंधित महिला न्यायाधीशाने फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवर लिंक शोधून रिचार्ज करण्याचा प्रयत्न केले असता सायबर फ्रॉडची ही घटना घडली आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सत्र न्यायालयातील एका महिला न्यायाधीशाने 14 मे रोजी दुपारी चार वाजता स्वतःचे चारचाकी वाहनाचे फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवरील लिंक सर्च करुन त्यावर आपले बँक खात्याचे डिटेल टाकले. त्यांचे फास्ट टॅग रिचार्ज झाले. त्यानंतर त्यांनी आपले बँक खाते नेटबँकिंगच्या माध्यमातून तपासले असता त्या बँक खात्यातून 2 लाख 75 हजार 399 रुपये एका अज्ञात खात्यात वळते झाल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोनकरुन माहिती दिली. तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली.
पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम 411, 420 आणि आयटी अॅक्टच्या कलम 66 (सी ) आणि 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सायबर सेलच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती गुन्हेगारांबद्दल ठोस माहिती लागलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
फास्ट टॅग रिचार्ज असो किंवा इतर डिजिटल सेवांचे रिचार्ज करायचे असल्यास संबंधित सेवेच्या अधिकृत संकेतस्थळावरुनच ते रिचार्ज केले पाहिजे असे सायबर तज्ज्ञ सांगतात. मात्र अनेक वेळेला घाई गडबडीत लोक गुगलवरुन रिचार्जसाठीची लिंक शोधून रिचार्ज करतात आणि नेमकं तिथेच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. कारण सायबर गुन्हेगार गुगलवर अनेक खोट्या लिंक्स टाकून सावज शोधात असतात. त्यामुळे तुम्हाला फास्ट टॅग किंवा मोबाईल सेवेचे रिचार्ज करायचे असल्यास संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडरच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर कारण सुरक्षित आहे.