Nagpur Crime News : नागपुरातील बिडीपेठ परिसरात भररस्त्यात झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या 'घोडा' याला पोलिसांनी Nagpur Police अटक केली आहे. वर्चस्वाच्या लढाईतून कुख्यात गुंड आसिफ ऊर्फ 'घोडा' याचा पुतण्या आणि भाच्याने मंगळवारी (3 जानेवारी) बिडीपेठ परिसरात शेख फिरोज शेख मोईनुद्दीन (वय 50) याची हत्या केली. आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून त्याच्या भाचा-पुतण्याने शेख फिरोज शेख मोईनुद्दीन याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.


मृत फिरोज हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. भारतमाता चौकात त्याचा पानठेला होता. सात वर्षापूर्वी आसिफ घोडा याने फिरोजच्या भावावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे फिरोजच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यानंतर दोन्ही गटांत वैमनस्य निर्माण झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये फिरोजचा फारुख याने आसिफवर प्राणघातक हल्ला केला. त्याचा बदला म्हणून घोडा आणि त्याच्या साथीदारांनी फिरोजच्या घरावर हल्ला केला. मंगळवारी मो. साकिब मो. सारिक अन्सारी (वय 19, रा. महेंद्रनगर, टेका) व शेख फैज शेख फिरोज (वय 18) या दोघांनी फिरोजवर हल्ला करुन त्याची हत्या केली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती तर मुख्य सूत्रधार घोडा हा फरार होता.


25 वर्षांपूर्वीचे वैर कारणीभूत


फिरोज आणि त्याच्या कुटुंबीयांशी घोडा याचे 25 वर्षांपूर्वीपासून वैर सुरु होते. घोडा आणि फिरोज हे दूरचे नातेवाईक होते. फिरोजने 25 वर्षांपूर्वी घोडाच्या आत्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर शत्रुत्व आणि बदल्याचा क्रम सुरु झाला, असे घोडा याने पोलिसांना सांगितले.


व्यसनमुक्ती केंद्रातून परतला अन् झाला गेम


फिरोजला अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन आहे. हे व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही भरती करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच तो व्यसनमुक्ती केंद्रातून घरी आला होता. मंगळवारी (3 जानेवारी) दुपारी फिरोज त्याच्या दुकानाजवळील दुकानदाराकडे चप्पल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. या दरम्यान शाकिब आणि फैज तेथे आले. दोघांनीही धारदार शस्त्रांनी फिरोजवर हल्ला केला. फिरोज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्याचे भाऊ मदतीला पोहोचण्यापूर्वीच आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 


दोघांना तरुणांना कामठीतून अटक


फिरोजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह सक्करदरा आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळावर पोहोचले. दोन्ही आरोपी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये कैद झाले होते. सक्करदरा ठाण्याच्या डीबी पथकाने दोघांनाही कामठी परिसरातून अटक केली होती. चौकशीत शाकिबने सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी फारुखने त्याचा मामा आसिफ घोडावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने फिरोजवर हल्ला केला.


संबंधित बातमी...


नागपुरात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एकाला संपवलं, दोन मारेकऱ्यांना पोलिसांकडून अटक