नागपूर : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 34 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून (Police) अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतली म्होरक्या किंवा मास्टरमाईंड फहिम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत.  तर, नागपूर क्राइम ब्रां ने आज दिवसभरात दहा जणांना ताब्यात घेतले असून हे सर्व हिंसाचार मध्ये सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घटना झालेल्या भागात, चिटणीस पार्क तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वतः पाहणी केली. त्यानंतर माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी, नागपूर हिंसाचार घटनेत फहीम खानचा रोल काय, याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. 


नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी अगोदर अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ज्या पद्धतीने पोलीस विभाग या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये, या संदर्भातील परिस्थिती जाणून घेत पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, नागपूर घटनेत फहीम खान मास्टरमाईंड आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर, याबाबत आत्ता काही सांगू शकत नाही, सध्या तपास सुरु आहे असे त्यांनी म्हटले. 


फहीम खानचा रोल काय?


नागपूर हिंसाचार फहीम खान हा प्रकरणातला एक आरोपी आहे, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याचा काय रोल आहे, हे सगळे आम्ही तपासत आहोत. त्याचं बोलणं प्रक्षोभक होत का? हे तपासलं जात आहे. त्याच्या मित्रांसोबत त्याचं काय बोलणं झालंय, त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे. तो गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर तसेच संध्याकाळी झालेल्या हिंसाचारामध्ये दोन्ही ठिकाणी मिळून आलेला आहे. त्यामुळे, या घटनेत त्याचा काय रोल आहे, हे सगळं आम्ही तपासात आहोत, असे रवींद्रकुमार सिंगल यांनी म्हटलं.


सायबर सेल स्वतंत्रपणे काम करतंय


हिसाचार घडलेल्या सगळ्या संवेदनशील भागांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही पाहणी करतो आहे, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. आरोपी अटक होत आहे की नाही या सगळ्यासंदर्भात माहिती घेत आहोत. सकाळपासून आठ ते दहा लोक ताब्यात घेतले आहे. एकूण 10 लोक आहेत, 5-7 मायनर लोकं सुद्धा असून सर्वांना ताब्यात घेतलं होतं. तर, सायबर सेल्स स्वतंत्रपणे काम करत आहे. याप्रकरणी, आणखी केसेस दाखल होणार आहे. इंटरनेट, सोशल मीडियावरचे मेसेजेस फॉरवर्ड केले आहेत. काही बाहेरच्या भागातही पोस्ट करण्यात आल्याची माहिती सायबर विभाग घेत असल्याचे सिंगल यांनी सांगितलेय. 


संचारबंदी रिलीफसंदर्भात माहिती


दरम्यान, नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आधीच 51 लोकांना ताब्यात घेतले असून इतर 500 पेक्षा जास्त अज्ञात संशयितांचा शोध सुरू आहे. त्याच मालिकेत आज 10 जणांना नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे. जशी जशी परिस्थिती सामान्य होत जाईल तसा रिलीफ दिला जाईल. सध्या आमच्या बैठका चालू आहे आणि पुन्हा आम्ही बैठका घेणार आहोत. त्या सगळ्यांनंतर कुठल्या संचारबंदीसाठी भागात सूट द्यायची, किती तासाची सूट द्यायची आहे हे सगळं काम आम्ही सुरू केल्याचंही सीपींनी सांगितलं. 


दरम्यान, प्रशांत कोरटकर प्रकरणात कोल्हापूर पोलीस तपास करत आहेत, आमच्याकडून जे काही सहकार्य करायचे ते आम्ही त्यांना करत आहोत, असे रवींद्र सिंगल यांनी म्हटलं.


हेही वाचा


मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?