नागपूर :  नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज कोरोनच्या रुग्णांनी दहा महिन्यातील सर्वात कमी रुग्ण संख्या आढळली आहे.  आज नागपुरात 46 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी रेट ही 1 टक्क्यांच्या खाली जाऊन 0.84 टक्के एवढा कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या पहिल्या लाटेपासूनच्या दहा महिन्यात नागपूर शहरात शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित फक्त तीन वेळा आढळले. 


नागपूर शहरात गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासूनच्या दहा महिन्यात पहिल्यांदाच कोरोना बाधितांचा दैनिक आकडा 50 च्या खाली गेला आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना संक्रमणाचा दर o.84 टक्के एवढा कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आणि या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेचा सामना करणाऱ्या नागपूरकराना दिलासा मिळाला आहे. 


आरोग्य प्रशासनाने आज संध्याकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहरात आज बाधितांची संख्या अवघी 46 एवढी असून ग्रामीण भागात 33 कोरोना बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे नागपूर शहरात या पूर्वी शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित आढळल्याचे फक्त दोन प्रसंग घडले आहेत. 25 जानेवारी 2021 रोजी नागपूर शहरात बाधितांची संख्या 99  एवढी आढळली होती. तर 15 नोव्हेंबर 2020 रोजी नागपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या फक्त 58 एवढी होती. त्यामुळे आज आढळलेले 46 कोरोनाबाधित म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये आलेल्या पहिल्या लाटेपासून नागपुरात कोरोनाचा निच्चांकी आकडा ठरतोय.


विशेष म्हणजे आज शहरात 5 हजार 455 जणांची कोरोना चाचणी होऊन त्यापकी फक्त 46 जण कोरोनाबाधित निघाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट ही पहिल्यांदाच 1 टक्क्यांच्या खाली जाऊन 0.84 टक्के एवढा कमी झाला आहे. आज नागपुरात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 389 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. अॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या ही अणे महिन्यानंतर तीन हजाराच्या खाली येऊन 2 हजार 922 एवढी झाली आहे. 


विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत नागपुरात रोज हजारो कोरोना बाधित आढळत होते. काही दिवसांसाठी तर दैनिक कोरोना बाधितांचा आकडा 5 ते 6 हजारांच्या घरात गेला होता. दैनिक मृत्यू संख्या ही शंभराच्या वर गेली होती.  तर अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ही 80 हजारांच्या घरात पोहोचल्याने नागपुरात हाहाकार मजला होता. लोकं बेड पासून औषध, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण भटकत होते. मात्र, अवघ्या काही आठवड्यात चित्र बदलला असून नागपुरात कोरोनाचा आलेख कमालीचा घसरला आहे.  कोरोनाची दुसरली लाट जेवढ्या गतीने वाढले त्यापेक्षा जास्त गतीने ओसरेल असा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज नागपुरात खरा ठरला आहे.