नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार पुन्हा येण्यास महत्त्वाची ठरली. राज्य सरकारकडून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 9000 हजार रुपये पोहोचले आहेत. मात्र, ही योजना यशस्वी करुन दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यास शासन विसरल्याचं चित्र आहे. अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला 50 रुपये देण्यात येतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप अंगणवाडी सेविकांना त्यांनी भरलेल्या अर्जांची रक्कम मिळालेली नाही. आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, असं अंगणवाडी सेविकांनी म्हटलं.
राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. योजना सुरू झाली तेव्हापासून हा लाभार्थी महिलांना मिळणारा सहावा हप्ता आहे. मात्र लाडक्या बहिणींचे 2 कोटी 34 लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे सरकार कडून मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून अद्यापही वंचित आहेत.
जून महिन्यात योजना लाँच झाल्यानंतर सरकारकडून अंगणवाडी सेविकांना महिलांचा एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी दिवस-रात्र काम करून शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले, त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 2 कोटी 34 लाख एवढी प्रचंड झाली आहे.
योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेतही आलं. मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये अद्यापही मिळालेले नाही. नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल, अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी नेमके किती फॉर्म भरुन घेतले याबाबतची आकडेवारी जमा करुन घेताना देखील ती पूर्णपणे घेतली नसल्याची तक्रार आहे. काही अंगणवाडी सेविकांनी जितके अर्ज भरले त्यापेक्षा कमी अर्जांची संख्या वरिष्ठांकडून नोंदवून घेतली गेल्याचंही समोर आलं आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलं आहे.
इतर बातम्या :