नागपूर : काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना गाडीतून बाहेर काढा आणि लाथा घाला, आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार अद्यापही ठाम असल्याचे संकेत त्यांनी स्वतःच दिले आहे. माझे वक्तव्य आधीच रेकॉर्डवर आहे. त्यामुळे त्यावर अधिक काय बोलावे असे केदार म्हणाले. दरम्यान केदार यांच्या समर्थकांनी आता माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची धुसफूस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.


काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याला गाडीतून बाहेर काढून लाथा घाला. पोलीस केस झाली तर चिंता करू नका मी पाहून घेईन अशी चिथावणी पक्षातील कार्यकर्त्यांना खुद्द पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या आढावा बैठकीत सुनील केदार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आगामी जिल्हा परिषद पोटनिवडणूक तसेच बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचे निर्देशच केदार यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. केदार एवढ्यावरच थांबले नाही तर गद्दारी करणारे नेते काँग्रेस पक्षाची पदे भोगणार, कोणीतरी मोठा नेता आपल्या पाठीशी आहे म्हणून कसंही वागणार असे चालणार नाही. असे कोणी करत असेल तर कार्यकर्त्यांनी त्यांना दोन हाणाव्या आणि मलाही त्याठिकाणी बोलवावे, मी पण मंत्रिपद सोडून त्या ठिकाणी येईल असेही केदार कार्यकर्त्यांना म्हणाले होते.


सुनील केदार यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका सुरू झाली. मात्र, आज प्रसारमाध्यमांनी केदार यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल खुलासा विचारल्यावर त्यांनी माझे वक्तव्य आधीच रेकॉर्डवर आहे. त्यामुळे जास्त भाष्य करणार नाही, असं सांगून ते आपल्या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचे संकेत दिले.


दरम्यान, सुनील केदार यांच्या वादग्रस्त आणि कार्यकर्त्यांना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर नागपूर जिल्ह्यात त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहे. सुनील केदार यांच्या वक्तव्याचा रोख माजी आमदार आशिष देशमुख यांच्या दिशेने होता हे ओळखून केदार समर्थकांनी आता माजी आमदार आणि सुनील केदार यांचे कट्टर विरोधक आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची मागणी पुढे केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आधीच आशिष देशमुख यांना पक्षातून काढून टाकण्यात यावे अशा आशयाचा ठराव संमत केले असून त्यावर श्रेष्ठींनी योग्य निर्णय घ्यावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सुनील केदार यांच्या समर्थक रश्मी बर्वे यांनी केली आहे.


सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्या दरम्यानचे वाद आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वी माजी आमदार आशिष देशमुख यांनी दोन दशक जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळा संदर्भात सुनील केदार यांच्यावर आरोप ठेवत, सहकारी बँकेत घोटाळा करणाऱ्या केदार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात केली होती. यापूर्वी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे भाजपकडून सावनेर मतदारसंघात उमेदवार होते. तेव्हा त्यांनी सुनील केदार यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सावनेरमध्ये कडवी झुंज दिली होती. त्यावेळेस आशिष देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासूनच केदार आणि देशमुख गट नागपूर जिल्ह्यात समोरासमोर असून कालांतराने आशिष देशमुख यांचे काँग्रेस प्रवेश झाले.. सुनील केदार मंत्री झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी सहकारी बँकेच्या जुन्या घोटाळा प्रकरणी केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केलेली मागणी. आणि त्यानंतर केदार यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य दोघांमधील वादाच्या जुन्या आगीत तेल ओतणारे आहे.