Lockdown In Nagpur : नागपूरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर नागरिाकांवर अनेक निर्बंध येणार आहेत. लाकडाऊनबाबत नेमके काय निर्बंध लागणार यासाठी लवकरच नोटिफिकेशन येईल. त्यानंतर पोलीस सर्व नियोजन करतील, असं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र पूर्णपणे सक्तीने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. बॉर्डर्स सील केल्या जातील. अनेक जागी पोलिसांची नाकाबंदी केली जाईल. ज्या गोष्टींना बंद करण्यास सांगण्यात आलं आहे, त्या सर्व गोष्टी बंद आहे की नाही याची पाहणी आम्ही करणार आहोत, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर येऊ नये. ज्या गोष्टींना बंद करण्यास सांगितले जाणार आहे, ते सर्व सक्तीने बंद केले जाणार आहे, असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं. 


काय सुरु राहणार?


नागपुरात लॉकडाऊन काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. 


Lockdown Big Breaking | राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य


काय बंद राहणार?


लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे. 


नागपुरात 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन


नागपूर शहरात लॉकडाऊन 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.


नागपूरची कोरोनाची आकडेवारी (10 मार्च)


नागपुरात काल (10 मार्च) रोजी 1710 ( नागपूर शहर 1433, नागपूर ग्रामीण 277) कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. सप्टेंबर 2020 नंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. काल 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.