नागपूर:  महाविकास आघाडीच्या 16 एप्रिलला होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेवरून मविआ आणि भाजपमध्ये घमासान सुरू झालंय. मविआच्या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये. मात्र स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.  यावर सुनावणी आज होणार आहे.


नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या विरोधात स्थानिक नागरिक न्यायालयात गेले आहे.  दर्शन कॉलनीतील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची परवानगी नाकारावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  दर्शन कॉलनी सद्भावना नगर इथल्या मैदानावर नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून सुमारे एक कोटींचा खर्च करुन विविध क्रीडा प्रकार आणि स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. मैदानावरील क्रीडासोयी राजकीय सभेमुळे खराब होतील, खेळाडूंना अनेक दिवस खेळता येणार नाही असा आक्षेप स्थानिकांनी नोंदवला आहे. तर मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासने महाविकास आघाडीला दिलेले परवानगी रद्द करावी, अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी केली आहे.


दर्शन कॉलनीच्या मैदानावरच सभा घेण्यावर मविआ ठाम


नागपुरातील दर्शन कॉलनी इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची 16 एप्रिलला सभा होत आहे. एकीकडे दर्शन कॉलनीतील मैदान राजकीय सभेसाठी देण्यात येऊ नये अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यांना भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांच्या पाठिंबाही आहे. असे असताना महाविकास आघाडी मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावरच वज्रमूठ सभा घेण्यावर ठाम आहे. या वज्रमूठ सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ फिरायला सुरुवात झाली आहे.


नागपूरच्या सभेवरून नाना पटोले नाराज


नागपूर सुधार प्रन्यासने या सभेला परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीने देखील या मैदानासाठी पैसे भरले आहेत. परंतु स्थानिकांचा या सभेला विरोध वाढत आहे. आधीच या सभेत अनेक विघ्न येत असताना आता अडचणी समोर आल्या आहेत. या सभेसाठी पूर्व विदर्भातून साधारण एक लाख लोकांची गर्दी जमवू असं महाविकास आघाडीचे नेते आठवडाभरापूर्वी बोलत होते. महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेच्या आयोजनाबद्दल विश्वासात घेत नसल्याने काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले व नितीन राऊत आयोजकांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.  दोन्ही नेते आयोजनाच्या वेगवेगळ्या बैठकांपासून दोन हात लांब दिसत आहे