Nagpur News Update : शहरात मागील तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत असताना मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी आणि सोमवारीही विजांच्या कडकडाटांसह वरुणराजा बरसला. या परतीच्या पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडविली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, (Department of Meteorology) या संपूर्ण आठवड्यात विदर्भात कमीअधिक प्रमाणात पावसाचा खेळ सुरूच राहणार आहे.


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर सध्या ढगांची दाटी झाली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह विदर्भात दिसून येत आहे. शहरात सोमवारी मध्यरात्रीही शहरातील काही भागांना विशेषतः दक्षिण नागपूरला पावसाने झोडपून काढले. याशिवाय रविवारी रात्री झालेल्या पावसाने नागपूरकरांच्या कोजागिरीच्या आनंदावर काहीसे विरजण पडले.


वरुणराजाने सोमवारी लावलेल्या हजेरीमुळे दुपारी उन तापल्यानंतर अचानक ढग दाटून आले. यासह मेघगर्जनेसह अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला. पाऊस थांबेपर्यंत अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. तर काही जण रेनकोट आणि छत्र्यांअभावी भिजत घरी परतले. मंगळवारीही पहाटेपासून जोरदार पावसाने सुरुवात झाली. शहरातील बहुतांश भागात जोरदार (Rain in Nagpur) पाऊस झाला.


विदर्भात ठिकठिकाणी पाऊस


हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार विदर्भातील (Vidarbha) बुलढाणा, गडचिरोली, अकोला व चंद्रपूर येथेही दमदार पाऊस झाला. राजस्थानसह अनेक राज्यांतून मॉन्सूनने माघार घेतली असली तरी, विदर्भातील पावसाळा अद्याप संपलेला नाही. हवामान विभागाने विशेषतः विंडी डॉट कॉम या संकेतस्थळाने पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या संपूर्ण आठवड्यातच पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


मराठवाड्यातही बरसला


यंदा जुलै महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मराठवाड्यात अनेक भागात अतिवृष्टी (Heavy Rainfall) पाहायला मिळाली. त्यातच आता परतीच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतांना पाहायला मिळाले. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत 100 मिलिमीटर अधिकचा पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान 679 मिलिमीटर असून, त्याच्या तुलनेत आतापर्यंत 772 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे 114 मिलिमीटर अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Eknath Shinde Party Symbol : ढालीने जनतेचं रक्षण करणार, कोणी अंगावर आल्यावर समोर तलवार धरणार; चिन्हावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया


Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय