मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 


ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन 


दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगत अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. 


तरीही तुरुंगात राहावं लागेल...


ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जरी जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर सीबीआयनेही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळाला नसल्याने त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे. 


ईडीने अनिल देशमुख यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी करत अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत सीबीआयला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत.