Gram Panchayat Election : साधारणपणे घरात सासू आणि सुनेमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमीच बघण्यात येते. पण गावाची कारभारी बनण्यासाठी सासू-सुनेमध्ये थेट लढत होते आहे. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोदरा देऊळगाव ग्रामपंचायतीमध्ये ही अनोखी लढत होत आहे. सासू सुना एकमेकींसमोर उभ्या ठाकल्याने ही लढत अतिशय रंगतदार होत आहे. 


भंडारा (Bhandara) गोंदियातील (Gondia) काही लढती अतिशय चर्चेत आहेत. भंडारा जिल्ह्यात दोन जाऊबाईंमधील लढत चर्चेत असताना गोंदिया जिल्ह्यात सासू-सुनेमधील लढतीने रंगत आणली आहे. परवा रविवारी 18 डिसेंबर रोजी 1650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीची निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडणार आहे. 15 वर्षांनंतर या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी महिला सरपंचपद (Female Sarpanch) राखीव झाले आहे. येथे सरपंच पदासाठी सासू- सुनेमध्ये थेट लढत होणार आहे. आता गावात प्रभावी महिला शोधून सरपंचपदासाठी उभे करणार म्हणून देऊळगाव येथील मंदा योगिराज ढवळे (सासू) यांना गावातील स्थानिक नेत्यांनी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे सरपंचपदासाठी निवडणुकीत उभे केले.


आता आपण निश्‍चित केलेली महिला सरपंच होणार, असे गावकरी समजत असताना. आपणही प्रभावी महिला आहोत, असे म्हणत सूनबाई कशी मागे राहणार म्हणून किरण मिलिंद ढवळे (सूनबाई) यांनीही आपल्या सासू विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत मोर्चा उभारला आहे. आपल्या विरुद्ध सरपंचपदासाठी अर्ज भरल्याने सासूबाई कोमात अन् सूनबाई जोमात अशी स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या डेली सोपच्या जाहिरातीला शोभेल अशी सासू विरुद्ध सून लढत आता बोदरा देऊळगावमध्ये पाहायला मिळत आहे. 


दोघींचेही गावात चांगले प्रस्थ आहे. गावकरी कोणाला मत द्यायचे, म्हणून बुचकळ्यात पडले आहेत. इतके कमी होते की काय ढवळे कुटुंबाचे नातेवाईकही या निवडणुकीत मतदार असल्याने कोणाला मत द्यायचे यावरून पेचात पडले आहे.  तरीही नातेवाईकांनी कोणाच्याही प्रचारात सामील न होता सावध पवित्रा घेतला आहे. 


सासूबाई म्हणताहेत, मी जुनी आहे, माझ्या दांडगा अनुभव आहे, त्यामुळे मलाच गावकरी विजयी करणार, तर मी सून असून गावकरी मलाच आपली मुलगी मानून मतदान करतील, या विश्‍वासात सूनबाई वावरत आहेत. 


दोघींचाही ही प्रचार जोमात सुरू आहे. गावकऱ्यांना आपण निवडून आल्यास काय फायदा होईल, हेसुद्धा दोघीही पटवून देत आहेच त्यामुळे दोघींच्या प्रचाराचा धडाका बघता, ही निवडणूक काटे की टक्कर, अशी होत आहे. त्यामुळे कोण बाजी मारेल आणि कोण गावाची कारभारी बनेल, बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या सासू-सुनेसोबत इतर चार अन्य उमेदवारही सरपंचपदासाठी निवडणूक लढवत असल्याने गावाचे राजकारण तापले आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, असे होऊ नये, म्हणजे झाले.


ही बातमी देखील वाचा


BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अरुण गवळीला फर्लो मंजूर