Chhagan Bhujbal : आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) पार पडला. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीने छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे.  नुतन मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.


मंत्रीमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना डच्चू


आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर इतर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात काही जुन्या  मंत्र्यांना डच्चू दिला आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहेत. तर शिवसेनेत तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना डच्चू दिला आहे. 


भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु 


दरम्यान, या आधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तीच बाब लक्षात घेत पक्षाकडून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाकडून नाराजी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना भुजबळ प्रतिसाद देणार का? याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


छगन भुजबळांनी शपथविधीला जाणं टाळळं


आज माजी मंत्री छगन भुजबळ हॉटेल रेडिसन ब्ल्यू मधेच होते. आज दिवसभर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासह शपथविधीला जाणं देखील टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीसाठी ओबीसी समाजाची ढाल म्हणून काम करून देखील मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांची नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. राजकीय लढाईत लढण्यासाठी छगन भुजबळांची गरज मात्र ज्यावेळी मंत्रिपदाची संधी द्यायची वेळ आली त्यावेळी थेट डावलणं योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली. राज्यात आमदारांची घरं जळत असताना ओबीसींच्या घरांवर हल्ले होत असताना सगळे ओबीसी नेते गायब होते. त्यावेळी महायुतीसाठी एकट्यानं लढाई लढून सत्ता अणण्यास मदत केली. मात्र, आता संधी द्यायच्या वेळी दुर्लक्ष केल्याने भुजबळांची नाराजी असल्याचं कळतंय. एकीकडे भुजबळांची नाराजी असली तरी उद्या विधीमंडळ कामकाजात भुजबळ सहभागी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली.  


महत्वाच्या बातम्या:


Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले