नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी विदर्भातून अनेकांनी संपर्क केल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. "एकनाख खडसे यांच्यानंतर अनेक नेते संपर्कात आले. विदर्भातून अनेक जण संपर्कात आहेत. परंतु निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत नाव सांगणार नाही," असंही जयंत पाटील म्हणाले. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर दौरा करत आहेत. सध्या ते विदर्भात आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूथ कमिटी बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून पक्षातील कार्यकर्ते आणि संघटनेला नवसंजीवनी देणासाठी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला सुरुवात केली आहे.
2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. तर 2019 मधील निवडणुकीत अनेक जण पक्ष सोडून गेले. परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष जोमाने कामाला लागला आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांचा राज्यभर दौरा सुरु आहे.
विदर्भातील अनेक जण संपर्कात
पक्षप्रवेशाबाबत जयंत पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस चांगली वाटते म्हणून लोक येतात. मागच्या अनुभवाचा पक्षप्रवेशाच्या निर्णयावर होत नाही. जनतेचा आधार असलेल्यांना पक्षात प्रवेश देत आहोत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर बरेच नेते संपर्कात आले. सकाळी एक नेता भेटून गेला. विदर्भातील अनेक जण संपर्कात आहेत. परंतु निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत नाव सांगणार नाही."
विदर्भ म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा. आता भाजपचे लोकप्रतिनिधी विदर्भात जास्त दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादीने विदर्भात आपली ताकद वाढवण्याकडे लक्ष दिल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. नागपूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पहिला चॉईस झाला पाहिजे असे प्रयत्न करा, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचं लक्ष
दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचं लक्ष आहे. या मतदारसंघाविषयी कार्यकर्ते आग्रही असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. पुढच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ मागणार का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षे आहेत. आमचं अस्तित्त्व कुठे चांगलं आहे, त्याप्रमाणे आम्ही जागेसाठी आग्रह करु. नागपूर शहरात एक किंवा दोन जागा लढल्या पाहिजे, ही माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांची मागणी आहे."
"नागपूर शहरात एक जागा मिळावी ही आमची आधीची मागणी होती. अगदीच काही नाहीतर दक्षिण- पश्चिम जागा द्यावी. आज आढावा घेताना जाणवलं की त्या मतदारसंघात आमचे कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रयत्न केला तर अधिक चांगलं जाळं तयार करु शकतो. दक्षिण-पश्चिम, पूर्व कोणत्याही मतदारसंघात आम्ही यशस्वी होऊ शकतो," असं जयंत पाटील म्हणाले.