Nagpur: राज्यात आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्षांनी शड्डू ठोकला असून ठाकरे गटाकडून नागपुरात महापालिकेच्या अग्निशमन दलातील रखडलेल्या भरती प्रकीयेवरून जोरदार आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री साहेब कॅलिफोर्नियातील अग्निशमन यंत्रणेचे वाभाडे काढण्यापेक्षा तुमच्या शहरातील अग्निशमन यंत्रणेकडे लक्ष द्या. फक्त 127 फायरमॅनच्या भरवश्यावर नागपूरकरांची सुरक्षितता असणे दुर्दैवी असल्याचं सांगत नागपूर महापालिकेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. महाराष्ट्राच्या उपराजधानीत अग्निशमन दलाचा कमकुवतपणा समोर आला असून प्रशासकीय दीरंगाईवर ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आजच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली. "मुख्यमंत्री साहेब, कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन यंत्रणेवर भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या शहरात काय परिस्थिती आहे, ते पाहा!" असा थेट सवाल आंदोलकांनी केला.
अग्निशमन यंत्रणेचा कमकुवतपणा, ठाकरे गट आक्रमक
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात गेले अडीच वर्ष रखडलेली भरती प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत जोरदार आंदोलन केले... एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये लागलेल्या आगीचा उल्लेख करत तिथल्या अग्निशमन यंत्रणेचा कमकुवतपणा सर्वांसमोर मांडतात... दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शहरात महापालिकेची अग्निशमन यंत्रणा प्रचंड कमकुवत असून अवघ्या 127 फायरमॅनच्या भरवशावर उपराजधानी नागपूरची सुरक्षितता राखली जात असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे...
कॅलिफोर्नियाच्या आगीचे वाभाडे काढण्यापेक्षा..
सप्टेंबर 2023 मध्ये नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलात 352 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि न्यायालयीन खटल्यामुळे आजवर ती भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही... उन्हाळ्यात दरवर्षी शहरात मोठ्या संख्येने आगी लागण्याच्या घटना घडतात.. नागपूरकरांची कोट्यवधींची संपत्ती त्यात भस्मसात होते, लोक जखमी होतात, अशा स्थितीत फक्त 127 फायरमॅनच्या भरवश्यावर नागपूरची अग्निशमन यंत्रणा राबविली जाणे दुर्दैवी आहे.. मुख्यमंत्र्यांनी कॅलिफोर्नियातील अग्निशमन यंत्रणेचे वाभाडे काढण्यापेक्षा त्यांच्या शहरातील अग्निशमन यंत्रणे संदर्भात लक्ष द्यावं अशी मागणी ही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे...