नागपूरः जिल्हा परिषद सदस्यांशी असभ्य वर्तणूक माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिले. माध्यमिक विभागाने दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तिसऱ्यास सोमवारी नोटीस देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


दिनेश बंग व अवंतिका लेकुरवाळे माध्यमिक शिक्षण विभागात गेले असता त्यांना कर्मचाऱ्यांनी वाईट वागणूक दिली. गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोघांनीही हा मुद्दा उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखाबाबत विचारणा केली असता 15 ते 20 मिनीट कोणतेही उत्तर दिले नाही.


सामान्य नागरिकांचे काय?


सदस्यांना अशी वागणूक मिळत असेल तर इतरांचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार योग्य नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाईचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना दिले. दरम्यान काटोलकर यांनी राजेवर व गुरनुले यांना या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर शंभरकर या अनुपस्थित असल्याने त्यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे कळते.


Special Trains : 32 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेनचे नियोजन, 13 सप्टेंबरपासून धावणार गणपती फेस्टिव्हल ट्रेन


कर्मचारी मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त


कार्यालयीन वेळेत मोबाईलवर सतत बोलणे, गेम खेळणे, नित्याचेच झाले आहे. असे कर्मचारी मग्रूरीने वागतात. आपले कुणीच वाकडे करु शकत नाहीत. या अविर्भावात असता. बंग आणि लेकुरवाळे शिक्षण विभागात गेले असता कर्मचारी मोबाईलवर खेळ खेळण्यात व्यस्त होते. तीनही महिला कर्मचारी होत्या. काही वेळाने पुन्हा विचारणा केल्यावर योग्य उत्तर न देता असभ्य वागणूक दिली. त्यानंतर विभागप्रमुख रवींद्र काटोलकर हे कार्यालयात नसल्याचे सांगितले.


शासकीय कार्यालयांची हीच स्थिती!


अनेक शासकीय कार्यालयात हीच स्थिती सामान्य नागरिक अनुभवत असतात. कर्मचारी आपल्या जागेवर हजर नसतात. तसेच इंटरनेट बंद आहे. साहेबांच्या मिटिंगमध्ये गेले आहे अशी कारणे या शासकीय विभागात देण्यात येतात. त्यामुळे यावर अंकुश लावण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Education : शाळेत शिकविणार 'सैनिकांचे शौर्य', नवे शैक्षणिक धोरणानुसार होणार बदल