नागपूरः प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिल्याने नवतापाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मागिल दोन-तीन दिवसांपासून वादळी पाऊस व ढगाळ वातावरणाने विदर्भाला चटक्यांपासून दिलासा दिल्यानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला होता.रविवारी नागपूर शहराच्या कमाल तापनामात एका अंशाची वाढ होऊन पारा 42.8 अंशांवर गेला. तर चंद्रपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या वैदर्भीयांना रविवारी आज सौम्य चटके जाणवले. बुलडाणाचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्यावर राहीला. रविवारी उन्हाचे सर्वाधिक चटके चंद्रपूरवासींना बसले. येथे सलग दुसऱ्या दिवशी 44 अंशाच्या वर तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी येथे पाऱ्याने 44.2 अंशांवर झेप घेतली. त्याखालोखाल तापमानाची नोंद नागपूरात झाली. आजपासून मात्र नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी व मंगळवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा तापण्याची शक्यता आहे.


नागपूरात कमाल 43 अंशावर पारा


नागपुरात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश दिसू शकते. सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 42 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 104 आहे, जो 'मध्यम' श्रेणीत येतो.



अकरापैकी पाच जिल्हे 'हॉट'


विदर्भातील दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट होती. या हॉट जिल्ह्यांमध्ये अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अनेक ठिकाणी तापमान 45 अंशांपार होता. विदर्भासह खान्देशमधील जळगावातही उष्णतेच्या लाटेचा तडाखा होता.


कोरडे वारे आणि स्थानिक कारणांमुळे चटके


राज्यात उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे गरम वारे, थेट उत्तरेकडून येणारे गरम वारे आणि स्थानिक कारणांमुळे तापमान वाढले होते. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तापमानाने सरासरी असलं तरी चाळीशी पार गेल्याने उकाडा जाणवत होता.विदर्भातील तापमानाची तर यंदाच्या मोसमातील सर्वोच्च पातळी गाठली होती.