नागपूर : महाराष्ट्राच्या प्रवेशदारावरच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या आंतरराज्य सीमेवर परिवहन विभागाच्या चेक पोस्टवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक ट्र्क चालकांकडून अवैध वसुली करत आहेत. एबीपी माझा समोर आपले गाऱ्हाणे मांडणाऱ्या ट्र्क चालकांनी या संदर्भात अवैध वसुलीचे सबळ पुरावेही समोर आणले. ट्रक चालकांचा आरोप आहे की एक हजार रुपयांची "अवैध देण" ( एंट्री ) दिल्याशिवाय कोणालाही या चेकपोस्टमधून महाराष्ट्रात प्रवेश करता येत नाही किंवा बाहेरही जाता येत नाही. अनेक ठिकाणी या प्रकारची तक्रार केल्यांनतरही कारवाई होत नसल्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे उघड भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप होतोय.


महाराष्ट्राच्या आंतरराज्य सीमेवरील चेकपोस्टवर येणाऱ्या ट्र्क आणि इतर कमर्शियल वाहनांचे ते घेऊन जात असलेल्या सामानासह वजन केले जाते. स्वयंचलित वजन काट्यावर वाहनाच्या वजनाची नोंद होत असतानाच डिजिटली त्या वाहनाच्या परवाने आणि इतर कागदपत्रे तपासले जातात. जर वाहनांमध्ये वजन जास्त असेल तर परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वाहनाला नियमाप्रमाणे दंड लावणे अपेक्षित असते आणि वजन नियमाप्रमाणे असेल तर त्या वाहनाला पुढे जाऊ दिले पाहिजे असे नियम आहे. मात्र, महाराष्ट्राच्या केळवद, खुर्सापार आणि कांद्री चेकपोस्टवर काही गुंड प्रवृत्तीचे लोकं वाहनांना थांबवतात आणि प्रत्येक ट्र्क चालकाकडून प्रत्येक फेरीसाठी एक हजार रुपयांची वसुली करतात. विशेष म्हणजे चेकपोस्ट वर परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित असताना हे सर्व प्रकार चालतात.


हीच अवस्था केळवद आणि इतर चेकपोस्टची आहे. चेकपोस्टवर सुरु असलेल्या या गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराबाबत एबीपी माझाने ट्रक चालकांशी बातचित केली. त्यांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आणि ही वसुली कशी उघडपणे केली जाते आणि त्या वसुलीला विरोध केल्यावर काय होते हे सर्व एबीपी माझाला सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे आधीच व्यवसायाचे कंबरडे मोडलेले असताना भ्रष्टाचारामुळे त्रास आणखी वाढला आहे. त्यासंदर्भात आमची तक्रार कोणीच ऐकत नाही म्हणून एबीपी माझाकडे आल्याचे त्यांचे म्हणणे आहे..


प्रति ट्रक प्रति फेरी एक हजार रुपयांच्या या वसुलीमुळे वाहतूक व्यवसायासमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या आधी हे त्रास कमी होते. व्यवसायही चांगले होते म्हणून वाहतूकदार आणि ट्रक चालक या अवैध वसुलीकडे कानाडोळा करून पैसे देत होते. मात्र, कोरोना संकटात वाहतूक व्यवसायाचे कंबरडे आधीच मोडले गेले आहे. त्यात सक्तीच्या अवैध वसुलीमुळे एक एक ट्रक मागे महिन्याकाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढला आहे. त्यामुळे वाहतूकदारही त्रस्त झाले आहे. परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये ही प्रत्येक परवान्यासाठी लाच मागितली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्या खुर्सापार आणि केळवद चेकपोस्टवर ही अवैध वसुली सुरु आहे ते चेकपोस्ट नागपूर ग्रामीण परिवहन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येते.


जे आरोप केले जात आहे ते काही वाहतूकदारांचे परिवहन विभागाच्या विरोधातले कट आहे. तरी या सर्व प्रकाराची चौकशी करू. चेकपोस्टवर एक खाजगी कंपनी परिवहन विभागासाठी ट्रकचे वजन करण्याचे काम करते. त्यांचे काही खाजगी कर्मचारी चेकपोस्टवर असतात. त्यांच्यापैकी कोणी अशी अवैध वसुली करत आहे का याची आम्ही चौकशी करू अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.


महाराष्ट्राच्या प्रवेशदारावरचे हे भ्रष्ट आचरण महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे. कारण महाराष्ट्रात येता जाता अवैध एन्ट्री द्यावी लागते असा समज त्यामुळे निर्माण होतोय. शिवाय भ्रष्टाचारामुळे विविध वस्तूंची वाहतूक महाग होऊन त्याची अप्रत्यक्ष झळ सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे परिवहनमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.