नागपूर : नागपुरात गुन्हेगारी संपली असे गृहमंत्री अनिल देशमुख जरी म्हणत असले तरी वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या गंभीर घटना पाहता त्यांचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये दिवाळीच्या आधी आणि नंतर अवघ्या 12 दिवसात हत्येच्या 9 घटना घडल्या आहेत. कुठे गँगवॉर तर कुठे पैसे वसुलीसाठी गोळीबार होत आहे. त्यामुळे गृहामंत्र्यांच्याच जिल्ह्यात कायद्याच्या राज्याला गुन्हेगारीचा सुरुंग लागल्याचे चित्र आहे.


सुशीला ढोबळे यांनी नागपूरच्या गुन्हेगारीत त्यांचा वृद्धापकाळाचा आधार गमावला आहे. भाजीचा ठोक व्यवसाय करणारे उमेश ढोबळेची काल (बुधवार) बेसा पॉवर हाऊस चौकाजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली. उमेश यांचे भाजीच्या व्यवसायातून अनेकांसोबत पैशाचे व्यवहार होते. आरोपींना उमेशकडून 6 लाख रुपये घ्यायचे होते. त्याच वादातून उमेश यांची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. मात्र, उमेशच्या आईने हे सर्व आरोप फेटाळले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा वाद कधीच उमेशने घरी सांगितला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार


दरम्यान या घटनेचा पोलिसांनी दिलेला तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. उसनवारीचे पैसे वसूल करण्यासाठी आरोपी शाकिर हसन आणि सय्यद जमील यांनी आशीर्वाद नगरच्या गार्डन जवळ बोलावले. उमेश तिथे पोहोचल्यावर शाकिर उमेशच्या काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हाच्या मागे बसून पुढे चालण्यास सांगितले. उमेशने थोड्या अंतरापर्यंत अॅक्टिव्हा नेताच पाठीमागे बसलेल्या शाकिरने जवळच्या पिस्तूलने उमेशच्या डोक्यावर गोळी झाडली. उमेश खाली कोसळतात आरोपींनी दुसऱ्या दुचाकीने पळ काढला.


दरम्यान, दिवाळीच्या काळात नागपुरात घडलेली गुन्ह्याची ही एकमेव घटना नाही. तर गुन्हेगारांनी चक्क रक्तरंजित दिवाळी साजरी केल्याचे दिसून येत आहे.


गेल्या 12 दिवसात घडलेले गंभीर गुन्हे




  • 18 नोव्हेंबर 2020
    सक्करदरा - गोळीबारीत भाजी विक्रेता उमेश ढोबळे याची हत्या.

  • 17 नोव्हेंबर 2020
    यशोधरा नगर - मोहम्मद तहसीन या तरुणाची चाकू भोसकून हत्या.

  • 16 नोव्हेंबर 2020
    कुही - ठवकर टोळीतील कृणाल ठाकरे आणि सुशील बावने या दोघांची हत्या, टोळीयुद्धातून ही हत्या झाली.

  • 14 नोव्हेंबर 2020

  • कपिल नगर - संतोष श्रीवास्तव या 60 वर्षीय चौकीदाराची हत्या.

  • 12 नोव्हेंबर 2020

  • सावनेरमध्ये विशाल शाही या महाविद्यालयीन तरुणाची संशयास्पद हत्या.

  • 12 नोव्हेंबर 2020
    मार्टिननगर भागातून एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून दोघांनी तिला गोरेवाडाच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

  • 10 नोव्हेंबर 2020
    हिंगणा - विनीत बनसोड या तरुणाची हत्या.

  • 10 नोव्हेंबर 2020
    प्रतापनगर - अनिल पालकर यांची संपत्तीच्या वादातून हत्या.

  • 8 नोव्हेंबर 2020


एमआयडीसी भागात अंगावर चिखल उडाला एवढ्या वादातून गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपीने एका मजुराची हत्या केली. याच्या शिवाय याच कालावधीत हत्येचे प्रयत्न, चोरी, घरफोडी, खंडणी वसूल करण्यासाठी हल्ले अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात दिवाळीचा काळ सामान्य नागरिकांसाठी कसा गेला असेल याचा अंदाज लावणे कठीण नाही. नागपूरच्या गुन्हेगारीची जाण असलेल्यांच्या मते नागपुरात पोलिसांचे दावे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना सारखे केले जाणारे उपाय सपशेल अपयशी ठरत आहेत, त्यामुळे पोलिसांनी आपल्या कार्यशैलीचा फेरआढावा घेण्याची गरज आहे.


विरोधकांनी नागपूरच्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्याला अलगद उचलले आहे. राजकीय द्वेषातून समाज माध्यमांवर सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणारं सरकार गुन्हेगारांवर कारवाई करायला धजावत नाही असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान याच काळात नागपुराच्या कळमना परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर ही लोकांनी हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागपुरात वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पोलिसांना दोष देणाऱ्या नागपूरकरांनी ही स्वतःच्या वागणुकीचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.