नागपूर : दोन दिवसांपूर्वी हवामान खात्यानं विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार भंडारा आणि गोंदियासह नागपूर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथील शेतीचे नुकसान झाले. या अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


हवामान खात्याने 25 व 26 जानेवारी या दोन दिवसांत विदर्भात गारपीट व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाबरोबर लहान आकाराच्या गारादेखील पडल्या.  नागपूर जिल्ह्यातील मौदा, खात, देवमुंढरी भागात सायंकाळी बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातही पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

राज्यातील पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते.

ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होतील आणि किमान 29 जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहतील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे 25 ते 27 जानेवारी या काळात काही प्रमाणात धुकं पडेल. या दरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील.

शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.