नागपूर : नागपुरात गुंडांची दहशत खूपच वाढली आहे. अनेक गुंड खंडणी मागून त्यासाठी मारहाण करुन सामन्य नागरिकांना त्रास देत आहेत. जबरदस्तीने लोकांकडून पैसे लुबाडत आहेत. परंतु नागपुरातलं पोलीस प्रशासन मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही पैशांसाठी नागपुरातल्या एका गुंडाने एका वृद्धाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
रामचंद्र निखारे (65) यांचे नागपुरातल्या कुंजीलालपेठ परिसरात फुलांचे लहानसे दुकान आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून ते त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. निखारे यांची दोन्ही मुलं त्यांना या कामात मदत करत होती. परंतु परिसरातील गुंड विक्की खोंडे आणि त्याचा मित्र सौरभ हे दोघे नेहमीच रामचंद्र यांच्या दुकानात येऊन त्यांना धमकावून पैसे घ्यायचे. पैसे देण्यास विरोध केल्यास चाकूचा धाक दाखवायचे.
रामचंद्र यांचा मोठा मुलगा रोशन शनिवारी दुकानाजवळच्या परिसरात फुलांच्या हारांची डिलिव्हरी देण्यासाठी सायकलने जात होता. तेव्हा गुंड विक्की खोंडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रोशनला अडवत त्याला मारहाण केली आणि रोशनजवळचे सर्व पैसे काढून घेतले. त्यानंतर जखमी रोशनने कुटुंबियांच्या मदतीने अजनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली. परंतु पोलिसांनी तक्रार न नोंदवता गुंड पुन्हा दिसल्यास आम्हाला कळवा असे सांगून एक मोबाइल नंबर दिला.
संध्याकाळी गुंड विक्कीला निखारे कुटुंबियांनी आपल्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. संतापलेल्या गुंडाने सहकाऱ्यांच्या मदतीने निखारे कुटुंबाचे घर गाठले आणि रोशनला मारहाण सुरू केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई-वडील मध्ये पडले. त्यावेळी गुंडाने वृद्ध रामचंद्र यांना जिन्यावरून जोरदार धक्का दिला. रामचंद्र खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी वेळीच म्हणजेच दुपारी आमच्या तक्रारीनंतर योग्य कारवाई करत गुंड विक्कीला जेरबंद केले असते तर आमचे वडील आज जिवंत असते, असे पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे.
एबीपी माझाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी दुपारी निखारे कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. त्याप्रमाणे एक पोलीस शिपाई गुंडांच्या शोधासाठी पाठवला होता. परंतु तो आम्हाला सापडला नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. तसेच रामचंद्र यांच्या मृत्यूनंतर गुंड विक्की खोंडे आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या निवडणुकांमुळे नागपुरात गुंडांविरोधात धडक कारवाई सुरु केल्याचा दावा नागपूर पोलीस करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला विक्की खोंडे सारखे मोकाट गुंड खंडणी वसुली आणि फुकटेगिरी करण्यासाठी रामचंद्र यांच्यासारख्या हजारो गरीबांचे जगणे कठीण करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुंडांची वाढती दहशत, खंडणीसाठी वृद्धाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2019 04:27 PM (IST)
सध्या निवडणुकांमुळे नागपुरात गुंडांविरोधात धडक कारवाई सुरु केल्याचा दावा नागपूर पोलीस करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अनेक मोकाट गुंड खंडणी वसुली आणि फुकटेगिरी करण्यासाठी गरीबांचे जगणे कठीण करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -