नागपूर: भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथील स्वातंत्र्य सैनिक शेषराव विश्वनाथ मुरकुटे यांचा  सन्मानपूर्वक आज नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.  'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ', व 'स्वराज्य महोत्सव' व केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार 9 ऑगस्ट भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सहा स्वातंत्र्यसैनिकांचा प्रतिनिधिक सत्कार राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला आहे. यामध्ये नागपूरचे शेषराव विश्वनाथ मुरकुटे यांचा समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर येथील आडगोंडा देवगोंडा पाटील, औरंगाबाद येथील डॉ.नवनीतदास श्रॉप, पुणे येथील गोपाळ अनंत शिखरे, सोलापूर येथील पापाशा अब्बास पटेल, अकोला येथील विलास व्यंकटेश मुंजे यांचाही समावेश आहे. 


19 राज्यातील 65 स्वातंत्र सैनिकांचा सत्कार


आज देशभरातील 19 राज्यातील 65 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्याचे आयोजन केंद्रीय गृह मंत्रालयांमार्फत करण्यात आले होते. गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेले शेषराव विश्वनाथ मुरकुटे 91 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक नव्या पिढीला आशीर्वाद देण्यासाठी आजही सक्रिय आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागपूर शहर उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी शाल, वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.


गोवा मुक्ती आंदोलनात नागपूरच्या 60 जणांचा सहभाग


यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला शुभेच्छा देताना शेषराव विश्वनाथ मुरकुटे यांनी नव्या पिढीने आपल्या देशासाठी बलिदानाची सर्वोच्च परंपरा यापुढेही सुरू ठेवावी, असे आवाहन केले. माझ्या वडिलांकडून मलाही प्रेरणा मिळाली होती. आपल्या नंतरच्या पिढीला स्वातंत्र्याची, संघर्षाची गाथा कळावी, यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे आयोजन केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी 1932मध्ये स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनात नागपूर येथून 60 जणांचा सहभाग होता. यावेळी त्यांनी या आंदोलनातील अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, "मलाही गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मी ते बघू शकतो. प्रशासनाने केलेल्या सत्कार बद्दल मी आभारी असल्याचेही ते म्हणाले.


यावेळी त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात नागपूर येथून प्रवास केल्यानंतर पुणे येथे जयवंतराव टिळक यांच्यामार्फत झालेले मार्गदर्शन, बेळगाव पर्यंतचा प्रवास, दर स्टेशनवर उस्फूर्तपणे होणारी मदत, ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांचा प्रभाव, स्थानिक लोकांनी दिलेले प्रेम, दशरथ हिराराम माळी या आपल्या सहकार्याला लागलेली गोळी, त्यावेळी झालेली पोर्तुगाल सैनिकांसोबतची झटापट अशा कितीतरी आठवणी यावेळी सांगितल्या.


Maharashtra Rains Update : 24 तासात राज्यात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी, लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस