नागपूरः मागिल दोन वर्षांपासून निर्बंधात असलेल्या गणेशोत्सवावर यंदा कुठलेही निर्बंध नाही. नागपुरकरांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा या उद्देशाने गणेशोत्सव मंडळ आणि सोसायट्यांसाठी निशुल्क सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पुढाकार घेतला आहे. या 'सांस्कृतिक गणेशोत्सव' अंतर्गत गायन, वादन, नृत्य, नाटक, गीतरामायण, देशभक्तीपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकांकिका आदींसाठी शहरातील कलाकार निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मंडळ आणि सोसायट्यांना 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहे.
यंदा निर्बंधमुक्त साजरा होत असलेल्या गणेशोत्सवासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पुढाकार घेतला असून मंडळांच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार वरील कार्यक्रमांसाठी निशुल्क शहरातील नामवंत कलाकार निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या आयोजनांची संपूर्ण जबाबदारी संस्कार भारतीची असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी मधुप पांडे, कोषाध्यक्ष राजेश बागडी, उपाध्यक्ष अशोक मानकर, संस्कार भारतीचे गजानन रानडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
फक्त मंच आणि ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी
शहरात सुमारे 450 नोंदणीकृत गणेश उत्सव मंडळ आहेत. तर अनेक सोसायट्यांमध्ये लहान मोठ्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी मंडळाच्या मागणीनुसार आणि कार्यक्रमाच्या क्षमतेनुसार आवश्यक कितीही कलावंत हवे असल्यास त्यांची निशुल्क व्यवस्था समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. तर मंडळांवर फक्त मंच आणि ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी राहील. या व्यतीरिक्त कुठलेही खर्च मंडळांना करावे लागणार नसून कलावंतांचे प्रयोजक म्हणून समिती जबाबदारी पार पाडणार आहे.
Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'
एका मंडळाला एक कार्यक्रम
हे सांस्कृतिक कार्यक्रम सतत 8 दिवस चालणार असून गणेशोत्सवादरम्यान एका मंडळाला एकच कार्यक्रम देण्यात येणार आहे. शिवाय लहान मोठ्या सोसायट्या आणि फ्लॅट धारकांसाठीही कार्यक्रम देण्यात येणार आहेत. गणेश मंडळांनी यंदा उत्साहात आणि सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी जयप्रकाश गुप्ता यांनी दिली.
27 ऑगस्टपर्यंत येथे करा अर्ज
आपल्या पारंपारिक कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने यंदा हा उपक्रम राबविण्यात येत असून इच्छुकांनी आपल्या सूचना आणि मागणी 27 ऑगस्टपर्यंत सांस्कृतिक महोत्सव कार्यालय, गंगोत्री अपार्टमेंट, बुटी लेआऊट, सिद्धी गणेश मंदिराजवळ, नागपूर 440022 येथे सादर कराव्या असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्याला हवे असलेल्या कार्यक्रमाची मागणी, आपल्या परिसरातील माहिती आदी मंडळांना दिल्यास योग्य सुविधा देणे सोयीचे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.