नागपूर : भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आज दुपारी संघ मुख्यालय नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर ज्येष्ठ संघ नेत्यांची भेट घेतली. सकाळी महाल परिसरातील संघ मुख्यालयात दाखल झालेल्या उमा भारती तब्बल 5 तास तिथे होत्या. विशेष म्हणजे यावेळी सरसंघचालक मोहन भागवत ही नागपुरात संघ मुख्यालयात उपस्थित होते. उमा भारती काल रात्री उशीरा नागपुरात दाखल झाल्या होत्या. रात्री रवी भवन सर्किट हाऊसमध्ये थांबल्यानंतर सकाळी त्या संघ मुख्यालयात दाखल झाल्या आणि दुपारपर्यंत तिथेच होत्या.
संघ वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार राजकारणासह मध्यप्रदेशात सत्तांतरानंतर नुकतंच झालेले मंत्रिमंडळ विस्तार अशा विविध विषयांवर उमा भारती यांची संघ नेतृत्वाशी चर्चा झाली. दरम्यान उमा भारती यांच्या नागपूर दौऱ्याचा मुख्य हेतू गुरू पौर्णिमेचा उत्सव आणि संघ नेत्यांचा आशीर्वाद घेणे, असे असल्याचे संघ सूत्रांनी सांगितले आहे. नुकतंच गुरू पौर्णिमा होऊन गेली असून संघाच्या सहा महत्वाच्या उत्सवामध्ये गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असते. तुलनेने युवा स्वयंसेवकांनी संघातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन संस्थेला मदत स्वरूपात गुरूदक्षिणा देणे, असे या गुरूपौर्णिमा उत्सवाचे स्वरूप असते.
त्या निमित्ताने राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रात कितीही मोठ्या पदावर गेलेले स्वयंसेवक संस्थेला गुरूदक्षिणा देतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेला नागपूरात येऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणाऱ्या उमा भारती यावर्षी गुरु पौर्णिमेला नागपूरात येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे आज उमा भारती यांनी नागपूर गाठून ज्येष्ठ संघ नेत्यांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यानंतर मध्यप्रदेशात परतण्यापूर्वी उमा भारती यांनी संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली.