Swachh Nagpur : एसटी बसेसमधील प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यावर एसटी महामंडळाने (ST Mahamandal) आता भर देण्यास सुरुवात केली आहे. गणेशपेठ बसस्थानक परिसरात स्वच्छता व अन्य सुविधा वाढविण्याचे नियोजन केल्या जात आहे. ज्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तेथे सफाई कर्मचारी कंत्राट पध्दतीने ठेवून स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कृती आराखडा तयार
मुख्यत: बसेसची (ST Bus) स्वच्छता, बसस्थानके स्वच्छ ठेवणे, स्वच्छतागृहे सुव्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष देण्याचे निर्देश महामंडळाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. ही बैठक काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बसस्थानकासह संपूर्ण परिसर, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यासाठी आता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी महामंडळाचे सफाई कर्मचारी नाहीत, तेथे आवश्यकतेनुसार कंत्राटी सफाई कामगारांची नियुक्ती करून स्थानिक पातळीवर सफाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतरही गरज भासल्यास विभागीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून स्वच्छता संस्थेची निवड करण्याचे मान्य करण्यात आले. ज्या डेपोमध्ये स्वयंचलित बस वॉशिंग मशिन नाहीत, तिथं नवीन वॉशिंग मशीन बसविण्याचे मान्य करण्यात आले. आता हे नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
अद्ययावत बसस्थानक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाचे गणेशपेठ बसस्थानक अद्ययावत करण्याचा विचार आहे. यात प्रामुख्याने बसस्टँडचा परिसर कसा स्वच्छ राहील? यावर भर दिला जात आहे. प्रवाशांच्या सुविधांबाबत अभिप्राय घेण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal )संचालक मंडळाच्या बैठकीनंतर प्रत्येक विभागाने कामास सुरूवात केली असल्याची देखील माहिती आहे.
अस्वच्छ बसेस धावणार नाहीत
बाहेरगावच्या सर्व बसेसची साफसफाई, बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब झालेल्या खिडक्या त्वरित बदलणे, अस्वच्छ बसेस धावणार नाहीत याची काळजी घेणे, बसेसच्या खिडक्या सरकवल्या जाव्यात, अशा पाच मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. बसमधील बसण्याची जागा चांगल्या स्थितीत नसल्यास किंवा फाटलेल्या सीट असल्यास त्या त्वरित दुरुस्त कराव्यात, बसचा बाह्य भाग पुन्हा रंगवण्यात यावा आदींकडे एसटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले आहे.
ही बातमी देखील वाचा...