Nagpur News Update : नागपूरच्या एका खासगी शाळेमध्ये मेडिटेश क्लास दरम्यान शिक्षिकेने एका दिव्यांग मुलाला जवळपास एक तास उन्हामध्ये उभे केले. अर्णव राठोड असे या मुलाचे नाव आहे. उन्हात उभे  केल्याने विद्यार्थ्याची प्रकृती  खालावली असून आई-वडिलांनी स्कूल प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे जाब विचारल्यानंतर स्कूल प्रशासनाने अर्णव राठोड याला शाळेतू काढन टाकले आहे.  या घटनेने अर्णवला जबरदस्त मानसिक धक्का बसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिलीय. 


अर्णव राठोड हा नागपूरच्या माऊन्ट लिटेरा स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकतो. तो 61 टक्के दिव्यांग असून त्याला जन्मजात सेरेबल पालसी  हा आजार आहे. त्यामुळे अर्णवला चालताना नीट तोलही सांभाळता येत नाही. काही वेळानंतर त्याला आधाराची गरज असते. मात्र अशा परिस्थितीतही अर्णव जिद्दीने सामान्य विद्यार्थ्यांसोबत शाळा शिकतो. मात्र, स्कूल प्रशासनाकडून त्याला भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे पुढे आले आहे. अर्णवच्या शाळेत बुधवारी पिटीचा वर्ग सुरु होता. त्यानंतर सर्व विद्यार्थी मैदानात बसून मेडिटेशन करत होते. मात्र अर्णवला जमिनीवर बसता येत नव्हते. त्याला खुर्चीची गरज होती. त्याच दरम्यान कोणत्यातरी विद्यार्थ्याने खोडी केली. त्यामुळे सर्व विद्यार्थी हसायला लागले. परंतु, अर्णवनेच खोडी केली असे शिक्षिकेला वाटले.  त्यामुळे मेडिटेशन क्लास संपेपर्यंत अर्णवला उन्हात उभे केले.


सुरुवातीला अर्णवच्या आई वडिलांना याची कल्पना नव्हती. गुरुवारी डीहायड्रेशनमुळे त्याची प्रकृती खराब झाली. दुसऱ्या दिवशी पालकांकडून अर्णवच्या आई-वडिलांना कळले की मेडिटेशन क्लासमध्ये अर्णवच्या शिक्षिकेने अर्णवला अशा प्रकारची वागणूक दिली गेली. त्यामुळे  अर्णवच्या  आई-वडिलांनी  शनिवारी स्कूल प्रशासनाला याबाबत जाब विचारला. परंतु, प्रशासनाने आई-वडिलांवर गैरवर्तुणुकीचा ठपका ठेवत अर्णवला शाळेतून काढून टाकले.  


अर्णव हा विकलांग आहे. त्याला शाळेतून काढून टाकल्याने कळल्यानंतर तो जबरदस्त मानसिक धक्क्यात आहे. अर्णवच्या आई-वडिलांना देखील या घटनेने त्रास झाला आहे. त्यामुळे आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी या संपूर्ण घटनेची पोलिस व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे  तक्रार केली आहे.


दरम्यान, स्कूल प्रशासनाने या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली असून शिक्षिका दोषी आढळल्यास त्यांच्यावर  कारवाई केली जाणार असल्याचे व्यसस्थापनाकडून सांगण्यात आले. परंतु, दिव्यांग विद्यार्थ्याला उन्हात उभं करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.