नागपूरः स्मार्टसिटीकडे वाटचाल करत असलेल्या नागपूर शहरातील वाडी परिसरात नागरिकांना गडूळ आणि अळ्यायुक्त पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यासंदर्भातील तक्रारी अनेकवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करुनही समस्या जैसे थे असल्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
एकीकडे शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. तर दुसरीकडे मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमुळे शहराचे नाव देश पातळीवर घेण्यात येत आहे. मात्र पाण्यासारखी मुलभूत सुविधा देण्यात उपराजधानीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. गेले अनेक दिवस नागपूर-अमरावती महामार्गालगत वसलेल्या वाडी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये फक्त दूषितच नव्हे, तर आरोग्यास अत्यंत अपायकारक असे जंत आणि अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडवर वसलेल्या लाइफस्टाइल टाऊनशिप, लेकव्यू अपार्टमेंट आणि त्यालगतच्या आंबेडकर नगरात गेले अनेक दिवस पिण्याचा पाणी दूषित, मळकट आणि नारू सारखे जंत असलेला येत आहे.अशीच स्थिती रमाबाई चौक, पंचशील चौक आणि सम्राट चौकच्या अवतीभवती वसलेल्या घरांची आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.दूषित आणि किडलेल्या पाण्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.
अनेकवेळा घेतली भेट
या समस्येबाबत काहींनी फोनद्वारे प्राधिकरणाला फोनवर तक्रार केली. तर अनेकांनी कार्यालय गाठून या दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत तक्रार केली. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना दूषित पाण्याचे फोटो आणि व्हिडिओही पाठविले. तरी परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे महाराष्ट्राची तहान भागवण्याचा दावा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाडीमध्ये पाण्यासह आजारांचा पुरवठाही करू पाहत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्य पाईपलाईनमध्ये गळती?
गेले अनेक दिवस तक्रार करूनही मुख्य पाईप लाईनमध्ये लिकेजची समस्या आहे, त्यात बाहेरचा दूषित पाणी मिसळला जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम करत आहोत, एवढच प्रशासकीय उत्तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देत आहे.त्यामुळे स्वतःच्या वातानुकूलित कार्यालयात बसलेले आणि शुद्ध पाणी पिणारे अधिकारी जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत आवश्यक मुद्द्यासंदर्भात कुंभकर्णी झोपेत आहे का असा सवाल वाडीतील नागरिकांनी विचारत आहे.
इतर बातम्या