नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात त्यांच्या विरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या प्रकरणात आता पुढील सुनावणी 4 जानेवारीला होणार आहे. आज नागपूर जिल्हा व सत्र न्यायायल्याच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीवेळी देवेंद्र फडणवीस स्वतः अनुपस्थित होते. मात्र त्यांचे वकील त्याच्या बाजूने न्यायालयात उपस्थित होते.


देवेंद्र फडणवीस हे मोठे राजकीय नेते असून आज ते पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांना आजच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत या प्रकरणात पुढील सुनावणी 4 जानेवारीला निश्चित केली आहे. कायद्याप्रमाणे त्या दिवशी फडणवीस यांनी न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. दरम्यान या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 2014 पासूनच न्यायालयीन लढाई लढवणारे अॅड सतीश उके यांनी आजच्या सुनावणीत फडणवीस यांच्या अनुपस्थितीचा विरोध करत न्यायालयाने त्यांच्याविरोधात योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.


याचिकाकर्ते सतीश उके यांनी या प्रकरणात पुढील कारवाई दोन आठवड्यानंतर ठेवण्याची ही मागणी केली होती. मात्र पुढील काही दिवसात राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून त्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहावे लागेल, असा युक्तिवाद करत फडणवीस यांच्या वकीलांनी चार आठवड्यांनंतर पुढील सुनावणी ठेवण्याची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली आहे. आता 4 जानेवारीला देवेंद्र फडणवीस खुद्द न्यायालयात उपस्थित राहतात की पुन्हा अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागतात स्पष्ट होणार आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबतच्या प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी तक्रार केली होती. नंतर त्यांनी जेएमएफसी न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. विशेष म्हणजे अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली ती याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली होती. त्यानंतर अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकरणावर प्राथमिक (कनिष्ठ) न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिल्यानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या समक्ष 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस जारी केली होती. त्याच आधारावर आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.