नागपूर : नागपुरात आज (29 एप्रिल) पोलीस भवनाच्या नवीन अद्यावत इमारतीचे उद्घाटन केलं जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी पोलीस भवनाचं उद्घाटन होणार असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे कार्यक्रमामाच्या अध्यक्षस्थानी असती. 110 कोटी रुपये खर्च करुन तयार झालेल्या या भव्य इमारतीच्या उद्घाटन पत्रिकेवरुन मात्र आता वाद रंगला आहे. 


राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पोलीस भवन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आलं होतं. चार वर्षांच्या कालावधीनंतर ज्यावेळी ही इमारत तयार झाली असून उद्घाटन होत आहे, तेव्हा उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रमुख पाहुण्यांमधून वगळून उपस्थितांमध्ये टाकण्यात आलं आहे. यामुळे भाजपच्या नागपुरातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 





विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाच पोलीस भवनासाठी 110 कोटी रुपये फक्त मंजूरच केले नव्हते तर लगेच पोलीस विभागाच्या बँक खात्यात वळते करण्यात आले होते. त्यामुळे एकाच टप्प्यात शंभर टक्के रक्कम पोलीस विभागाला मिळाल्यामुळे तत्परतेने या भव्यदिव्य पोलीस भवनाचं निर्माण कार्य पूर्ण झालं आहे.


दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून नाव वगळून उपस्थितांमध्ये टाकल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळतं. त्यामुळे फडणवीस आजच्या या उद्घाटन सोहळ्यात हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे.


कसं आहे नागपूर पोलीस भवन?
नागपूर सिव्हिल लाईन्समध्ये हे पोलीस भवन उभारण्यात आलं आहे. या पोलीस भवनाचं दोन विंगमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. 'ए' विंगमध्ये पोलीस आयुक्तालय तर 'बी' विंगमध्ये ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय असेल. सुमारे चार एकरमध्ये असलेल्या पोलीस भवनाची इमारत सात मजल्यांची आहे. 2018 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केलं होतं. 110 कोटी रुपये खर्च करुन सुसज्ज अशी पोलीस भवनाची इमारत अवघ्या चार वर्षात तयार होऊन सज्ज झाली आहे.