नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते वसंत पुरके यांची जीभ घसरली आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान वसंत पुरके यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा बाप काढत काँग्रेसची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. विशेष म्हणजे जनसंघर्ष यात्रेच्या आधीच्या टप्प्यातही वसंत पुरके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती.


केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा पूर्व विदर्भात सुरु झाला आहे. काल नागपुरात दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबांचा दर्गा आणि गणेश टेकडी मंदिराचे दर्शन घेत यात्रेला सुरुवात केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि रामटेक या दोन ठिकाणी काँग्रेसची सभा झाली. या सभांमधून काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

वसंत पुरके यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी एकेरी भाषेत बोलत मोदींच्या 'काँग्रेस मुक्त भारत'च्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही, असं पुरके म्हणाले. शेकडो महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अष्टपैलू वाटतो. माझा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला आहे, त्यांनी बाबा राम रहीमला आपल्या घरी घेऊन जावे. बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपावर हल्लाबोल केला. गेल्या निवडणुकांच्या वेळेस दिलेल्या घोषणा अजून पूर्ण झालेल्या नसताना भाजप नेत्यांनी नव्या आश्वासनाची जुमलेबाजी सुरु केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता भाजप नेत्यांनी सवर्णांना 10 टक्के आरक्षणाची नवी जुमलेबाजी सुरु केली आहे. मात्र आधी घोषणा केलेल्या मराठा आरक्षणाचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाचे विषय अजून प्रलंबित असताना भाजपने सवर्ण आरक्षणाची जुमलेबाजी सुरु केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.