नागपूर : आजच्या शिक्षक दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन संवाद झाला. शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचा अभिवचन यावेळी शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.


आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील शिक्षकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवोल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते. तर नागपूर वरून शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर उपस्थित होते.


चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकाचे कौतुक


मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात त्यांच्या शाळकरी जीवनातील आठवणी सांगितल्या. महानगरपालिकेच्या 23 नंबरच्या शाळेत शिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना शिकवणाऱ्या परब गुरुजींची आठवणही सांगितली. काळ कितीही बदलला तरी शिक्षकांचा आदर कधीच कमी होऊ शकत नाही. आई-वडिलांनंतर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या शिक्षकाचे स्मरण कायम होत असते. कितीही अडचणी, कितीही बदल झाले तरी समाज निर्मितीचे कार्य व ज्ञानदानाची प्रक्रिया शिक्षकांशिवाय कोणीही पार पाडू शकत नाही. कोरोना काळात तर शिक्षकांनी बदललेल्या फॉरमॅटमध्ये ऑनलाइन शिक्षण देऊन आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात काही नाविन्यपूर्ण प्रयोग झाले. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवसांची शाळा चालविणाऱ्या एका शिक्षकाचे तोंडभर कौतुक केले. शिक्षकाच्या अशैक्षणिक कार्यापासून तर पगारांच्या तारखेपर्यंतच्या सगळ्या विषयांवर मुख्यमंत्री मोकळेपणाने बोललेत.


शिक्षकांनी मांडल्या समस्या


नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांनीही यावेळी आपल्या समस्या त्यांच्या समक्ष मांडल्या. नागपूर जिल्ह्यातून बोलण्याची संधी मिळालेले उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथील शिक्षक एकनाथ पवार यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक विकास संदर्भात शासन जी कार्यप्रणाली तयार करेल त्याची शंभर टक्के अंमलबजावणी नागपूरमध्ये केली जाईल, अशी ग्वाही दिली. या ऑनलाइन बैठकीनंतर शिक्षकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधताना आनंद झाल्याचे सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


One Station One Product : 'वन स्टेशन, वन प्रोडक्ट' योजना ऑक्टोबरमध्ये सुरू होणार, नागपूर विभागातील 10 रेल्वे स्थानकांची निवड


Malnutrition : कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ, ऑगस्ट अखेरपर्यंत 1117 मुलांची नोंद